Last updated on April 9th, 2024 at 01:35 pm
(मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव, मासिक पाळीत रक्ताच्या गाठी पडतात, मासिक पाळी दरम्यान गाठी)
मासिक पाळीत रक्ताच्या गाठी पडणे हे बहुतेक वेळ सामान्य बाब जरी असली तरी नेहमीच तसे असेल असे नाही. याबाबतीत इतर खबरदारी घ्यावी लागेल अशा बऱ्याच गोष्टी यामधे अंतर्भूत आहेत. या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला मासिक पाळी मध्ये रक्ताच्या गाठी पडणे आणि त्या विषयी इतर महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.
मासिक पाळी ही कोणत्याही स्त्रीच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक असते. पण या मासिक पाळी विषयी अनेक समस्या देखील उद्भवत असतात. जसे की अनियमित मासिक पाळी, १५ दिवसाला मासिक पाळी येणे, मासिक पाळी चुकणे. त्याच समस्यांपैकी एक म्हणजे मासिक पाळी मध्ये रक्ताच्या गाठी पडणे.
या समस्या विषयी विषयी या ब्लॉग मध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. ब्लॉग मध्ये मासिक मासिक पाळी मध्ये रक्ताच्या गाठी का पडतात किंवा मासिक पाळीमुळे रक्ताच्या गुठळ्या का होतात? त्याची कारणे, निदान आणि उपचार या घटकांविषयी माहिती सुद्धा तुम्हाला जाणून घेता येणार आहे.
चला तर मग.
मासिक पाळीत रक्ताच्या गाठी पडणे सामान्य आहे का ?
बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान रक्ताच्या गुठळ्या म्हणजे रक्ताच्या गाठी पडणे या सारख्या समस्या आढळतात. पण तुमच्या मासिक मध्ये रक्ताच्या गाठी पडणे हे सामान्य आहे का की यामधे अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे हे तुम्हाला माहिती अससणे आवश्यक आहे.
तर याबाबतीत एकदम सरळ आणि सोपे उत्तर आहे की हो. तुमच्या मासिक पाळी दरम्यान रक्ताच्या गाठी किंवा गुठळ्या पडत असतील तर ते सामान्य आहे. बहुतेक स्त्रियांच्या बाबतीत हे घडते. अलीकडील काही दिवसांमध्ये बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि आहार यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे आपल्याला आढळते.
विशेषकरून मासिक पाळी च्या सुरुवातीचे २-३ दिवस, ज्यांना नुकतीच मासिक पाळी येणे चालू झाली असेल आणि ज्यांची मासिक पाळी बंद होण्यास सुरुवात झाली असेल अशांमध्ये रक्ताच्या गाठी पडणे हे अगदी हमखास लक्षण दिसते.
आता तुमच्या मासिक पाळी मध्ये रक्ताच्या गाठी पडत असतील तर ते सामान्य आहे हे वाक्य सुद्धा एकदम सामान्य आहे ढोबळ आहे. याही पुढे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहेत. ब्लॉग मध्ये पूढील भागात या गोष्टी तुम्हाला आपोआप समजून येतील.
मासिक पाळी मध्ये रक्ताच्या गाठी का पडतात?
तुमच्या मासिक पाळी मध्ये रक्ताच्या गाठी पडत असतील तर त्या का पडत आहेत याची काही कारणे देखील आहेत. ती कारणे तुम्ही जाणून घेणे महत्वाचे आहे. पण त्या अगोदर मासिक पाळी मध्ये रक्ताच्या गाठी का तयार होतात याची एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून याची माहिती आपण बघणार आहोत.
जेव्हा तुमची मासिक पाळी चालू होते तेव्हा गर्भधारणा नाही झाली तर त्यातून ४ ते ५ दिवस रक्त आणि त्यासोबत गर्भाशयातील काही टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात. याला तुम्ही मासिक पाळी मधील स्त्राव किंवा menstrual bleeding म्हणता. या दरम्यान तुमच्या गर्भाशयातील आतमधील अस्तरांच्या रक्तवाहिन्या गळून पडतात आणि तेथून रक्तस्त्राव होत असतो. या ४-५ दिवसांच्या काळात अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होऊ नये याची खराबरदारी आपले शरीर घेत असते.
या साठी तुमचे शरीर प्लेटलेट्स (platelets) नावाच्या पेशींना एकत्रित करून रक्तवाहिन्यांमधून येणाऱ्या रक्ताला घट्ट करून तिथे क्लोट (blood clots) म्हणजे गाठी तयार करतात. यानंतर रक्तातील घट्ट करणारे प्रोटीन (coagulating factors) त्या गाठी भोवती एक मजबूत फिब्रिण (fibrin) नावाचे आवरण तयार करते. यामुळे रक्ताच्या गाठी अधिक घट्ट होतात.
अशा पद्धतीने तुमचे शरीर मासिक पाळी दरम्यान अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होऊ नये म्हणून एक प्रतिकारात्मक क्रिया म्हणून रक्ताच्या गाठी तयार करत असते. ही झाली नैसर्गिक आणि सामान्य प्रक्रिया. जी की आपण बघितली की असे होत असेल तर ते सामान्य आहे.
आता या सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया द्वारे ज्या रक्ताच्या गाठी पडतात त्या कशा असतात हे तुम्ही जाणून घेणे महत्वाचे आहे. कारण या प्रकारच्या रक्ताच्या गाठी तुम्हाला मासिक पाळी मध्ये आढळत असतील तर सामान्य आहे हे तुम्हाला कळून येईल.
सामान्यपणे मासिक पाळी दरम्यान येणाऱ्या रक्ताच्या गाठीची खालील वैशिष्ठ असतात.
- गडद लाल रंगाची असतात किंवा काही वेळी काळ्या रंगाची असतात.
- आकाराने नाण्यांच्या आकारा एवढ्याच असतात ( यापेक्षा मोठ्या नाही ).
- रक्ताच्या गाठी अधूनमधून आढळतात ( वारंवार नाही ).
वरील लक्षणे तुम्हाला तुमच्या मासिक पाळी मध्ये येणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या किंवा गाठी मध्ये आढळत असतील तर तुम्हाला विशेष चिंता करण्याची आवश्यकता नाही.
पण जसे की मी वर सांगितले की मासिक पाळी मध्ये रक्ताच्या गाठी पडणे हे सामान्य आहे, हे वाक्य अगदी ढोबळ वाक्य किंवा साधे वाक्य झाले. त्या पुढे देखील तुम्हाला काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. त्या गोष्टी आता तुम्हाला यापुढे कळतील.
मासिक पाळी दरम्यान साधारणता वरील नियम धरून जर रक्ताच्या गाठी पडत असतील तर सामान्य आहे. पण या व्यतिरक्त इतर परिस्थिति आढळत असेल तर मात्र ते सामान्य नाही. तिथे तुम्हाला काळजी करण्याची आणि अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे सुद्धा गरजेचे ठरू शकते.
मासिक पाळीच्या गुठळ्यांबद्दल मी कधी काळजी करावी?
मासिक पाळी मधील येणाऱ्या गाठी किंवा गुठळ्या या बहुतेक वेळ सामान्य जरी असल्या तरी काही वेळा इथे थोडे गंभीर प्रकरणं असू शकते. बऱ्याच आजारांमध्ये आणि आरोग्य परिस्थितिमध्ये मासिक पाळी मध्ये रक्ताच्या गाठी आढळू शकतात.
त्यामुळे कोणत्या परिस्थिति मध्ये तुम्हाला मासिक पाळी मध्ये येणाऱ्या रक्ताच्या गाठी बद्दल काळजी करायला हवी ते बघूया.
- जर गाठी नाण्यांच्या आकारांपेक्षा मोठ्या आकाराच्या असतील तर.
- जर या गाठी वारंवार तुमच्या मासिक पाळी मध्ये आढळत असतील तर.
- जर तुम्हाला जर २ तासांनी तुमचा पॅड बदलावा लागतो तेवढा स्त्राव आणि गुठळ्या पडत असतील तर.
- जर का रक्ताच्या गाठी सोबत तुम्हाला cramp ( पोटात पेटके ) सुद्धा होत असतील तर.
वरील पैकी सर्व परिस्थितिमध्ये किंवा कोणती ही एक परिस्थिति आढळत असेल तर त्यावर अधिक लक्ष देण्याची गरजा आहे. अशा वेळी तुम्हाला तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्या बद्दलचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
मासिक पाळीत रक्ताच्या गुठळ्या कशामुळे होतात?
नैसर्गिक पणे रक्ताच्या गाठी शरीरात कशा पद्धतीने तयार होतात त्याची माहिती तुम्ही वर बघितली आहे.
पण मासिक पाळी मध्ये काळजी कराव्या लागणाऱ्या आणि उपचार घ्याव्या लागणाऱ्या गाठी का तयार होतात, त्याची कारणे काय आणि कोणत्या आजारांमध्ये त्यांची उत्पत्ति होते त्याची माहिती आता इथे बघूयात.
१. गर्भाशयात अवरोध निर्माण होणे
मासिक पाळी मध्ये जे रक्त आणि स्त्राव बाहेर पडत असतो तो गर्भाशयाच्या मार्गानेच योनीतून बाहेर पडत असतो. पण काय होईल जर या गर्भाशयातच अवरोध म्हणजे अडथळा निर्माण झाला तर. गर्भाशयात अडथळा किंवा अवरोध निर्माण झाला तर त्या मार्गाने येणारा स्त्राव हा योनीतून बाहेर पडू नाही शकणार. परिणामी तिथे स्त्राव आणि रक्त साचुन जमा होऊन त्याच्या गुठळ्या किंवा गाठी तयार होतील.
आता कोणत्या कारणांमुळे गर्भशयात अवरोध निर्माण होतो. गर्भाशयात अवरोध निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी इतर गोष्टींची वाढ होते. त्याचीच माहिती आपण आता पुढे बघूयात.
फायब्रॉइड्स (uterine fibroids)
या गर्भाशयात तयार होणाऱ्या गाठी आहेत. गर्भाशयाच्या आतमधील स्तरावर या तयार होतात. या सहसा स्नायू पासून तयार होणाऱ्या गाठी असतात. पण या मुळे गर्भाशयात अडथळा निर्माण होऊन मासिक पाळी मध्ये बाहेर पडणारा स्त्राव जमा होऊन तिथे गाठी तयार होतात.
गर्भाशयात फायब्रॉइड्स च्या गाठी झाल्यावर मासिक पाळी मध्ये रक्ताच्या गाठिसह इतर लक्षणे जसे की पाठदुखी, अनियमित मासिक पाळी आणि शारीरिक संबंध वेळी वेदना होणे ही लक्षणे सुद्धा जाणवू शकतात.
एंडोमेट्रिओसिस (endometriosis)
एंडोमेट्रिओसिस हा अनैसर्गिक वाढीचा प्रकार आहे. यामधे तुमच्या गर्भशयाचा काही भाग इतर ठिकाणी वाढतो. म्हणजे गर्भाशया च्या पेशी चा काही भाग हा गर्भाशय व्यतिरिक्त इतर अवयव किंवा भागांमध्ये वाढतो. यामुळे सुद्धा गर्भाशयात अवरोध निर्माण होतो ज्यामुळे इथे गाठी तयार होतात.
याशिवाय एंडोमेट्रिओसिस मध्ये इतर लक्षणे सुद्धा जाणवू शकतात. जसे की ओतीपोटात दुखणे, मासिक पाळीमध्ये जुलाब, उलट्या, वंध्यत्व, मासिक पाळी मध्ये असामान्य रक्तासत्राव, संबंध ठेवताना वेदना.
एडेनोमायोसिस (adenomyosis)
एडेनोमायोसिस तुमच्या गर्भाशयाचे अस्तर तुमच्या गर्भाशयाच्या स्नायूंच्या भिंतीमध्ये वाढते. यामुळे तुमच्या गर्भाशयाची जाडी अनैसर्गिक पद्धतीने वाढली जाते. यामुळे गर्भाशयामद्धे एक प्रकारे अवरोध निर्माण होतो.
ट्यूमर
कोणत्याही प्रकारचा ट्यूमर तुमच्या गर्भाशयात अडथळा निर्माण करत असतो. विशेष करून गर्भाशयातील ट्यूमर च्या गाठी आणि गर्भशाय ग्रीवा (cervix) च्या गाठी. तसेच यामधे अतिरिक्त स्त्राव सुद्धा जाणवू शकतो.
२. गर्भपात
गर्भधारणा झाल्यावर सुरुवातीच्या काही दिवसात जर गर्भपात झाला तर अतिरिक्त रक्तस्त्राव आणि रक्ताच्या गाठी जाणवू शकतात. काही वेळा तुम्हाला गर्भधारणा झाल्याची कल्पना नसेल तर तुम्ही कदाचित मासिक पाळी मध्ये रक्तस्त्राव झाल्याचा संशय घेऊ शकता.
म्हणजे तो स्त्राव कदाचित गर्भपात होऊन गर्भ बाहेर पडल्याचा असतो पण तुम्हाला वाटू शकते की मासिक पाळी चा स्त्राव आहे. त्यामुळे असे काही चित्र आढळल्यास लवकर तज्ञ डॉक्टरांना भेटून त्याबद्दल योग्य मार्गदर्शन आणि उपचार घ्या.
३. रक्तस्रावाचे विकार (bleeding disorder)
रक्तस्रावाचे विकार म्हणजे ब्लडिंग डिसऑर्डर. या आजारांमध्ये रक्त पातळ आणि घट्ट होण्याच्या क्रिये मध्ये बिघाड होतो. सामान्यता रक्त पातळ आणि घट्ट होण्याच्या अनुषंगाने तुमच्या रक्तातील ठराविक प्रोटीन जसे रक्त गोठण्याचे फॅक्टर्स (clotting factors), प्लेटलेट्स , फिबरिण हे घटक महत्वाची भूमिका बजावत असतात.
त्यामुळे या घटकांचा शरीरात अभाव किंवा अतिरिक्त प्रमाण यामुळे सुद्धा तुमच्या मासिक पाळी मध्ये रक्ताच्या गाठी पडणे किंवा गुठळ्या पडणे अशा घटना घडू शकतात.
वरील सर्व कारणांमुळे मासिक पाळी दरम्यान ज्या रक्ताच्या गाठी पडतात किंवा गुठलल्या पडतात त्यासाठी तुम्ही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेणे आवश्यक आहे.
मासिक पाळी मध्ये रक्ताच्या गाठी यावर निदान आणि उपचार
निदान
तुमच्या मासिक पाळी मधील रक्ताच्या गाठी चे अचूक आणि योग्य वेळी निदान करणे अत्यंत आवश्यक ठरते. बहुतेक वेळा तर या सामान्य असतात. पण काही वेळा या गाठी इतर आजाराचे लक्षण असू शकते किंवा भविष्यात उद्भवणाऱ्या एखाद्या आजारचे लक्षण असू शकते. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांकडून याचे योग्य वेळी आणि अचूक निदान करणे आवश्यक ठरते.
निदान करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला मासिक पाळी, शारीरिक संबंध आणि तुमच्या जोडीदारविषयी वेगवेगळे प्रश्न विचारू शकता. तसेच काही तपासण्या देखील करू शकतात. तुमच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि तपासणी अंती आलेले निकाल बघून डॉक्टर तुमचे गोगय निदान करत असतात.
तपासणी मध्ये रक्त तपासणी, पॅप स्मीअर, गर्भाशयाची बायोप्सी, अल्ट्रासाऊंड, सोनोहिस्टेरोग्राम, Hysteroscopy, या आणि इतर काही तपासण्या देखील डॉक्टर सुचवू शकतात.
- रक्त तपासणी- या तपासणी मध्ये रक्ताच्या गाठी रक्तस्त्रावाच्या विकारांमुळे तर नाही हे तपासले जाते, तसेच यामुळे थायरॉईड आणि अनैमिया संबंधित आजारांची देखील माहिती मिळेल.
- पॅप स्मीअर- गर्भाशयाच्या ग्रीवे (cervix) संबंधित ही तपासणी असते. गर्भाशयाच्या ग्रीवेचा कॅन्सर, तिथे असणाऱ्या इन्फेक्शन बद्दल या तपासणी मध्ये माहिती मिळत असते.
- गर्भाशयाची बायोप्सी- गर्भाशयाच्या छोट्या तुकड्याचा नमूना घेऊन त्याची तपासणी करून परीक्षण केले जाते. यामुळे गर्भाशयाच्या कॅन्सर विषय माहिती मिळेल.
- अल्ट्रासाऊंड- यामधे गर्भाशय आणि जवळील अवयवांची माहिती आणि त्यांचे आजार कळतात.
- Hysteroscopy– ही विशेष गर्भाशयाची तपासणी असते. गर्भशायाच्या आतील परिस्थितीचे निरीक्षण करून त्या ठिकाणी असणाऱ्या विविध परिस्थितीची माहिती या तपासणी द्वारे केली मिळवली जाते.
या व्यतिरीक डॉक्टर तुम्हाला तुमचे लक्षण आणि आणि इतर घटकांचा विचार करून इतर तपासण्या देखील करायला लावू शकतात.
उपचार
मासिक पाळी दरम्यान रक्ताच्या गाठी पडणे या परिस्थितिमध्ये सहसा दोन प्रकारचे उपचार डॉक्टर तुम्हाला सुचवू शकतात. एक म्हणजे औषधी आणि दुसरे म्हणजे शस्त्रक्रियात्मक.
१. औषधी उपचार
औषधी उपचार मध्ये डॉक्टर तुम्हाला काही औषधी सुचवू शकतात. मासिक पाळी मध्ये रक्ताच्या गाठी या सहसा तुम्हाला मासिक पाळी मध्ये होणाऱ्या अतिरिक्त रक्तस्त्रावमुळे होतात. त्यामुळे सर्वात महत्वाच म्हणजे तुम्हाला तो अतिरीक्त रक्तस्त्राव थांबायला औषधे जसे की
- गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जाऊ शकतात
- ब्लीडिंग डिसोरडेर असेल तर tranexamic acid च्या गोळ्या
- गर्भाशय ग्रीवा (cervix) चे इन्फेक्शन असेल तर अॅटीबयोटिक्स (antibiotics).
२. शस्त्रक्रिया
औषधांव्यतीरिक्त काही शस्त्रक्रिया सूचित केल्या जाऊ शकतात. अर्थातच काही परिस्थितिमध्ये दूसरा पर्याय नसेल तर. परिस्थिति जसे की गर्भाशयाच्या गाठी, एंडोमेट्रिओसिस, फिब्रॉईड, ट्यूमर यामधे तुम्हाला शस्त्रक्रिया पर्याय सांगितले जाऊ शकतात. विशेष करून जर या गाठी चा आकार मोठा असेल तर.
थोडक्यात काय तर रक्ताच्या गाठी तयार होण्यासाठी जबाबदार कारणे आणि इतर काही महत्वाची घटक लक्षात घेऊन डॉक्टर तुम्हाला तुमच्या समस्येवर उपचार सुचवू शकतात.
३. मासिक पाळी रक्ताच्या गाठी पडणे यावर घरगुती उपाय
तुमच्या मासिक पाळी दरम्यान रक्ताच्या गाठी पडत असतील तर त्यावर अचूक निदान आणि उपचार करण्याची जबाबदारी ही तज्ञ डॉक्टरांची आहे. त्यामुळे परस्पर कोणतेही उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरी घेऊ नये.
पण उपचार व्यतिरिक्त तुम्ही रक्ताच्या गाठी किंवा मासिक पाळी संबंधित कोणताही त्रास असेल तर तो थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय नक्कीच करू शकता. त्याचीच माहिती पुढे बघूया.
- दालचीनी- मासिक पाळी संबंधित समस्या साठी दालचीनी अत्यंत उपयुक्त असा पदार्थ आहे. तुम्ही यासाठी दालचीनी चा चहा पिऊ शकता किंवा दालचीनी चा तुकडा बारीक चाउन खाऊ शकता.
- आले- यामधे तुम्हाला ताजे आले वापरावे लागतील. ताजे आले घेऊन त्याचा चहा पिऊ शकता किंव पाण्यामध्ये आले उकळून त्याची वाफ घेऊ शकता.
- आले आणि धूप- मासिक पाळी मध्ये रक्ताच्या गाठी पडणे हे सहसा अतिरिक्त रक्तस्त्राव होत असेल आढळते. अभ्यासात असे आढळून आले की आले आणि धूप दोन्ही सेवन केलेल्या व्यक्तींमध्ये होणारा अतिरीक्त रक्तस्त्राव कमी झाला.
- उष्ण उपचार- मासिक पाळीत गाठी पडतात तेव्हा त्या बाहेर पडत असताना पोटात खूप वेदना होतात. या वेदना तुम्ही पोटावर हीटींग पॅड ठेवून कमी करू शकता. नाहीतर प्लॅस्टिक बॉटल मध्ये गरम पाणी भरून ती पोटावर वेदना होतात त्या ठिकाणी ठेवून शेक द्यावा.
थोडक्यात
मासिक पाळी दरम्यान रक्ताच्या गाठी पडणे ही नक्कीच बहुतेक वेळा सामान्य आहे आणि म्हणूनच याकडे अधिक गांभीर्याने बघण्याची गरज नक्कीच नाही. पण जर रक्ताच्या गाठी वारंवार येत असतील, आकाराने मोठ्या असतील, एक तासात १ पेक्षा जास्त pads बदलावे लागत असतील तर ही बाब गंभीर आहे आणि या साठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
तेव्हा मासिक पाळी दरम्यान रक्ताच्या गाठी कडे तुम्हाला गांभीर्याने लक्ष जरी देण्याची गरज नसेल तरी लक्षणे आणि त्याची वैशिष्ट याकडे मात्र तुम्हाला लक्ष ठेवून असणे गरजेचे आहे.
FAQ’s
मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होण्याचे कारण काय आहे?
हार्मोनल असंतुलन, गर्भाशया चे विकार, रक्तस्त्रावा चे आजार आणि गर्भपात ही काही कारणे मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव करू शकतात.
मला दर 2 आठवड्यांनी मासिक पाळी का येत आहे?
तुम्हाला दर २ आठवड्यांनी मासिक पाळी येण्याचे अनेक कारणे असू शकतात. यामधे सामान्यता तणाव, हार्मोनल असंतुलन, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर, रजोनिवृत्ती, थायरॉईड चे आजार ही काही करणे असू शकतात. अचूक निदान आणि त्यावरील उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
मासिक पाळीच्या दरम्यान रक्त गोठण्याचे कारण काय?
मासिक पाळीच्या दरम्यान रक्त गोठणे हे बहुतेक वेळा सामान्य असू शकते. पण काही वेळा हे रक्तस्त्राव विकार, गर्भाशय विकार किंवा गर्भपात यामुले घडू शकते.
मी माझ्या मासिक पाळीला रक्तस्त्राव कसा थांबवू शकतो?
मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव थांबवणे अशक्य आहे. तुम्ही मासिक पाळी अगोदर पाळी पुढे ढकलणे किंवा मासिक पाळी मध्ये अधिक प्रमाणात होणारा रक्तस्त्राव कमी करण्यासाठी काही उपाय योजना किंवा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
गुठळ्यांमुळे पीरियड क्रम्प्स होतात का ?
गुठळ्यांमुळे पीरियड क्रम्प्स होतात. किंबहुना सामान्यता पेक्षा अधिक प्रमाणात होतात.
Article reviewed by- Dr. Sachin Ghogare
Owner of healthbuss.
Health expert, professional, consultant and medical practitioner.
Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS).
Working as Community Health Officer.
Maharashtra Council of Indian Medicine Registration number I-92368-A.
Central healthcare professional registry ID 83-2348-4448-2747
2 thoughts on “मासिक पाळीत रक्ताच्या गाठी पडणे म्हणजे नेमके काय? जाणून घ्या कारणे, निदान आणि उपचार”