Last updated on July 26th, 2024 at 03:31 pm
डायबेटिस होण्याची कारणे वरवर जरी सोपी वाटत असली तरी ती तेवढीच क्लिष्ट आणि व्यापक आहेत. डायबेटिस होण्याची कारणे समजून घेणे तो टाळण्याच्या दृष्टीने महत्वाचे जरी असले तरी या आजाराची क्लिष्टता आणि गंभीरता समजून घेणे देखील महत्वाचे आहे.
काही वर्षांपूर्वी क्वचित लोकांमध्ये आढळणारा डायबेटिस आता सर्रास बहुतेक लोकांमध्ये आढळतो. एवढेच नव्हे तर भारत आता डायबेटिस असणाऱ्या लोकांच्या संख्या मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन नुसार जगात डायबेटिस असणाऱ्या प्रत्येक 7 व्यक्ति पैकी 2 व्यक्ति भारतातून आहेत. यावरून तुम्हाला डायबेटिस च्या संबंधित आकडेवारीची भयावह स्थिति लक्षात येईल.
डायबेटिसचा प्रसार आणि त्याची वाढ ही सर्वच देशांसाठी एक चिंतेचा विषय आहे. त्याचे एक मुख्य कारण म्हणजे मध्ये हा आजार प्रत्येक दुसऱ्या दीर्घ आजाराशी संबंधित असतो किंवा इतर आजारांसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या कारणीभूत ठरत असतो.
तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात डायबेटिस चा प्रवेश होण्यापासून थांबवू शकता. त्यासाठी तुम्ही फार काही करण्याची गरज नाही. डायबेटिस होऊच नये या अनुषंगाने तुम्ही डायबेटिस होण्याची कारणे सविस्तर आणि योग्य रीतीने समजून घ्या. एकदा की डायबेटिस होण्याची कारणे काय हे समजले की त्यावर तुम्ही काम करून डायबेटिस होण्यापासून स्वतःला वाचवू शकता.
या ब्लॉग मी तुम्हाला डायबेटिस होण्याची सर्व कारणे सोप्या, स्पष्ट आणि सविस्तर पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा सर्व माहिती लक्ष देऊन वाचा जेणेकरून तुम्हाला त्यातील बारकावे समजून घेऊन स्वतःला डायबेटिसपासून दूर ठेवता येईल.
थोडक्यात डायबेटिस म्हणजे काय?
डायबेटिस म्हणजे शुगर, मधुमेह. आता नेमके म्हणजे डायबेटिस काय.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, जेव्हा तुमच्या रक्तातील ग्लुकोज म्हणजे साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा तुम्हाला डायबेटिस झाला आहे असे समजावे. ही झाली डायबेटिस ची एक साधी सरळ व्याख्या.
रक्तातील साखर का वाढते, कशामुळे वाढते आणि इतर संबंधित सविस्तर माहिती माझ्या या दुसऱ्या ब्लॉग मध्ये दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता.
डायबेटिस होण्याची कारणे
डायबेटिस हा अनेक गुंतागुंत असलेला आजार आहे. म्हणूनच मी वर सांगितल्याप्रमाणे याचा प्रभाव इतर अनेक आजार आणि ते आजार उत्पन्न करण्यामध्ये मध्ये होत असतो. त्यामुळे डायबेटिस होण्याची कारणे देखील बरीच आहेत आणि ती करणे देखील गुंतगुंतीची आहेत.
कारणांच्या बाबतीत अजून एक विचार करायचा म्हटल्यावर तो आहे डायबेटिस चे प्रकार. कारण डायबेटिस च्या प्रकारानुसार त्याची कारणे ठरतात. या ब्लॉग मध्ये मी सविस्तर डायबेटिस चे प्रकार आणि ते का आढळतात याची माहिती दिलेली आहे. ती वाचूनच इथे पुढचे वाचा.
इतर बाबतीत खोलवर न जाता आपण आपल्या महत्वाच्या मुद्याकडे सविस्तर बघूया. यामध्ये आपण डायबेटिस टाइप 1 आणि डायबेटिस टाइप 2 ची कारणे एक एक करून बघणार आहोत.
टाइप १ डायबेटिस ची कारणे
टाइप 1 डायबेटिस ची कारणे सांगण्या अगोदर तुम्हाला थोडक्यात टाइप 1 डायबेटिस म्हणजे काय आणि त्यामध्ये काय होते हे सांगतो. याबद्दल सविस्तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये वाचायला मिळेल.
टाइप 1 डायबेटिस मध्ये रक्तात ग्लुकोज चे नियंत्रण करणारे हॉरमोन इंसुलिन ची निर्मिती होत नाही. यामुळे होते असे की रक्तातील साखरेचे म्हणजे ग्लुकोज चे प्रमाण हे वाढत जाते. अशा वेळी याला टाइप 1 मधुमेह म्हणतात. आता या यामध्ये इंसुलिन का तयार होत नाही वगैरे याची कारणे बघूयात.
टाइप 1 डायबेटिस साठी जबाबदार असणारी जी कारणे आहे त्यावर अजून तज्ञ लोक काम करत आहेत. कारण टाइप 1 डायबेटिस ची कारणे अजून स्पष्ट नाहीत. तरी देखील सामान्यपणे यासाठी जी कारणे जबाबदार ठरवता येईल, त्याची माहिती इथे बघूयात.
१. इंसुलिन तयार न होणे किंवा अत्यल्प प्रमाणात तयार होणे
टाइप १ डायबेटिस का होतो आणि त्याची सविस्तर कारणमीमांसा मी या ब्लॉग मध्ये स्पष्ट केलेली आहे. टाइप १ डायबेटिस हा एकच कारणामुळे होतो. ते कारण म्हणजे तुमच्या शरीरात ग्लुकोज चे नियंत्रण करणारे इंसुलिन हॉरमोन अजिबात तयार न होणे किंवा खूप कमी प्रमाणात तयार होणे. आता इथे आपण हे हॉरमोन का तयार होऊ शकत नाही आणि कोणत्या परिस्थिति मध्ये ते तयार होऊन शकत नाही याबद्दल माहिती बघणार आहोत.
आनुवंशिक घटक
ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांना टाइप १ डायबेटिस आहे त्यांना देखील टाइप १ डायबेटिस होण्याची शक्यता अधिक राहते. म्हणजे टाइप १ डायबेटिस चा कौटुंबिक इतिहास असेल तर त्या घरातील इतर सदस्यांना टाइप १ डायबेटिस होण्याची शक्यता अधिक राहते.
ह्याचे कारण म्हणजे काही जणूके (genes) हे इंसुलिन तयार करण्याच्या प्रक्रिये साठी महत्वाचे असतात. काही वेळा या जणूकांमध्ये बिघाड होऊन इंसुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावते किंवा थांबते. पुढे हेच जणूके पुढच्या पिढीमध्ये येतात. त्यामुळे त्यांना देखील टाइप १ मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
पर्यावरणीय घटक
काही लोकांमध्ये जन्मता टाइप १ मधुमेह आजार असतो, पण तो सुप्त स्वरूपात असतो. या मध्ये त्या व्यक्तीला टाइप १ मधुमेह चे कोणतेही लक्षण दिसत नाही. पण आयुष्याच्या एखाद्या टप्प्यात पर्यावरणीय काही घटकांचा संबंध आल्यावर टाइप १ मधुमेह चे लक्षणे दिसायला लागतात. म्हणजे थोडक्यात हे पर्यावरण घटक टाइप १ डायबेटिस साठी ट्रिगर करणारे घटक ठरतात. हे घटक कोणते ते बघूयात.
- व्हायरल इन्फेक्शन्स
- नवजात काळात लवकर आहार देणे
- विषारी द्रव्यांचा प्रादुर्भाव
२. स्वयंप्रतिकार स्थिती (Autoimmune disease)
स्वयंप्रतिकार स्थिती ही रोगप्रतिकार शक्ति च्या उलट आहे. रोग प्रतिकार शक्ति आपल्याला बाहेरच्या आक्रमनांपासून वाचवण्यासाठी मदत करते. म्हणजे बाहेरच्या घटकांपासून झालेल्या संक्रमनांपासून लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ति उपयोगी ठरत असते.
पण जेव्हा हीच रोगप्रतिकार शक्ति बाहरेच्या घटकांशी न लढता आपल्याच शरीरातील घटकांशी लढून आपल्या शरीराला नुकसान पोचवते तेव्हा त्याला स्वयंप्रतिकार स्थिति उत्पन्न होणे म्हणतात.
जेव्हा आपली रोग प्रतिकार शक्ति शरीरातील इंसुलिन तयार करणाऱ्या बेटा पेशी (beta cell) शी लढून बेटा पेशी उद्ध्वस्त करतात तेव्हा टाइप १ मधुमेह उत्पन्न होण्याची शक्यता वाढते. कारण बेटा पेशी उद्ध्वस्त झाल्या तर त्यापासून इंसुलिन तयार होऊ शकत नाही. अशा वेळी जो मधुमेह उत्पन्न होईल त्याला टाइप १ मधुमेह म्हणावे.
हे काही कारणे टाइप १ डायबेटिस उत्पन्न करण्यामध्ये जबाबदार ठरू शकतात. टाइप १ डायबेटिस उत्पन्न होण्यामद्धे कोणत्या स्थिति आणि अजून कोणती कारणे कारणीभूत ठरत असतील यावर अजून बरेच संशोधन आणि अभ्यास करणे चालू आहे. वैज्ञानिक यावर काम करत आहेत. पण विशेष मधुमेह टाइप १ यावर काम करणाऱ्या ट्रायलनेट (trial net) या संस्थेकडून केलेल्या रिसर्च नुसार संभाव्य कारणे यांची माहिती आपण आत्ता बघितली.
टाइप २ डायबेटिस ची कारणे
टाइप २ डायबेटिस होण्याची कारणे अनेक आढळतात. टाइप १ डायबेटिस मध्ये जस इंसुलिन तयार न होणे ही महत्वाची बाब ठरते तसे टाइप २ मधुमेह मध्ये इंसुलिन चा प्रतिकार (insulin resistance) ही गोष्ट महत्वाची ठरते. इंसुलिन चा प्रतिकार काय असते हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. पण त्या अगोदर इंसुलिन म्हणजे काय, इंसुलिन चा परिणाम काय, इंसुलिन कुठे तयार होते अशी मूलभूत माहिती तुम्ही जाणून घेणे अपेक्षित आहे. त्याबद्दल या ब्लॉग मध्ये तुम्हाला सविस्तर वाचायला मिळेल.
इंसुलिन चा प्रतिकार (insulin resistance) म्हणजे जेव्हा तुमचे शरीर किंवा शरीरातील पेशी या इंसुलिन ला प्रतिसाद न देता रक्तातील वाढलेले ग्लुकोज चा योग्य उपयोग करण्यास असमर्थ होते.
टाइप १ डायबेटिस मध्ये इंसुलिन च तयार होत नाही किंवा कमी प्रमाणात होते. पण टाइप २ मध्ये इंसुलिन तर असते, पण शरीर पेशी त्या इंसुलिन ला प्रतिसाद देत नाहीत. म्हणजे जे इंसुलिन चे काम आहे, रक्तातील साखरेचे नियंत्रण करणे, ते या ठिकाणी होऊ शकत नाही. परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि टाइप २ मधुमेह होतो.
याच बरोबर टाइप २ मधुमेह होण्यास इतर घटक ही महत्वाचे ठरतात. ते ही आपण बघणार आहोत.
१. जास्त वजन असणे
तुमचे जास्तीचे वजन किंवा लठ्ठ पणा तुमच्यामध्ये टाइप 2 मधुमेह चा धोका वाढवतात. विशेषकरून तुमच्या पोटासमोर जास्त चरबी असणे हे अधिक घातक ठरते. अनेक संशोधनात पोटासमोर असणारी जास्त प्रमाणात चरबी ही तुमच्यामध्ये टाइप 2 मधुमेह चा धोका वाढवतात असे सिद्ध झाले आहे.
जेव्हा तुमचे वजन जास्त असते तेव्हा शरीरात अवयवांभोवती सुद्धा चरबी चा एक स्तर तयार होतो. ही चरबी रक्तात दाहक (anti-inflammatory component) पदार्थ सोडतात. हे दाहक पदार्थ इंसुलिन च्या कार्यामध्ये बिघाड करून शरीरामध्ये इंसुलिन प्रती प्रतिवाद वाढवतात. यामुळे स्वादु पिंड मधील बेटा पेशी बिघाड आणि रक्तातील ग्लुकोज मध्ये वाढ होऊन टाइप 2 मधुमेह चे लक्षण दिसायला लागतात.
२. शारीरिक हालचाल नसणे
शरीराची कमी किंवा अजिबात हालचाल नसणे हे सुद्धा तुमच्या टाइप 2 मधुमेह ला आमंत्रण ठरू शकते. अधिक वेळ कमी शारीरिक हालचाली तुमच्या स्नायू द्वारे कमी ग्लुकोज चे शोषण करतात आणि पोटा भोवती चरबी तयार करण्यास वाव देतात. यामुळे परिणामी तुमच्या इंसुलिन च्या प्रतिकारात वाढ होते.
३. अनुवंशिकता
अनुवंशीकते चा घटक सुद्धा टाइप 2 डायबेटिस मध्ये महत्वाचा जबाबदार घटक ठरू शकतो. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना जर टाइप 2 डायबेटिस असेल तर तुम्हाला सुद्धा टाइप 2 डायबेटिस होण्याची शक्यता अधिक राहते. जर तुमच्या आई वडिलांपैकी एकाला टाइप 2 डायबेटिस असेल तर तुम्हाला तो होण्याचा धोका 40 टक्क्याने वाढतो आणि जर दोघांना असेल तर तुम्हाला होण्याचा धोका 70 टक्क्याने वाढतो.
या विषयामद्धे आपण फार काही करू शकत नाही. पण मधुमेह होऊ नये या अनुषंगाने जर आपण आपला आहार, जीवनशैली व्यवस्थित ठेवली तर हा धोका अधिक कमी होतो.
४. वंश
हा घटक तेवढा महत्वाचा नाहीये. पण याचा देखील काही प्रमाणात प्रभाव टाइप 2 मधुमेह होण्यामद्धे आढळतो असे अनेक संशोधनात सिद्ध झाले आहे. जसे की अमेरिकन, आशियाई, पॅसिफिक आयलँडर्ससह काही वंश आणि काळ्या वंशाच्या लोकांना गोऱ्या लोकांपेक्षा टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता नेहमीच जास्त राहते.
५. वाढलेले कोलेस्टेरॉल
तुमच्या शरीरातील वाढलेले कॉलेस्ट्रॉल तुमच्यामध्ये टाइप 2 मधुमेह चा धोका वाढवतात. तुमच्या रक्तात असणारे अतिरिक्त कॉलेस्ट्रॉल चे प्रमाण हे बेटा पेशीचे कार्य आणि रक्तातील साखरेचे नियमन बिघाडतात. विशेष करून लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) कोलेस्टेरॉल चे अतिरिक्त प्रमाण.
संबंधित वाचा- कॉलेस्ट्रॉल कमी करण्याचे उपाय
६. आहार
तुम्ही घेत असलेला आहार हा टाइप 2 डायबेटिस चे लक्षणे वाढवण्यात आणि कमी करण्यात अत्यंत महत्वाचा ठरतो. आहार, इंसुलिन आणि ग्लुकोज यांचा सरळ सरळ संबंध येत असल्यामुळे तुम्हाला या मधुमेह टाळण्याच्या दृष्टीने आहारा कडे विशेष लक्ष देण्याची गरज असते.
आहारामध्ये विशेष करून
- उच्च प्रक्रिया केलेले
- उच्च-कार्बोहायड्रेट पदार्थ
- Saturated fats
वारंवार सेवन केल्यामुळे तुम्हाला टाइप 2 डायबेटिस होण्यास काहीच उशीर लागणार नाही. सांगितलेल्या या सर्व पदार्थांमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत झपाट्याने वाढ होते. परिणामी स्वादुपिंडावर ताण येतो.
वारंवार असेच चालू राहिल्यावर कालांतराने शरीरात इंसुलिन प्रतिकार (insulin resistance) निर्माण होतो. आणि मग पुढचे परिणाम हे कधीही न थांबणारे असतात.
७. औषधे
ठराविक औषधे हे टाइप 2 डायबेटिस साठी कारणीभूत ठरू शकतात. औषधे जसे की स्टेरॉईड. स्टेरॉईडस औषधे ग्लुकोनोजेनेसिसला (gluconeogenesis) क्रियेला चालना देऊ शकतात. ग्लुकोनोजेनेसिस एक क्रिया आहे ज्या द्वारे शरीर यकृत मार्फत ग्लुकोज ची निर्मिती करत असते. दुसरे म्हणजे ग्लुकोनोजेनेसि मुळे रक्तातील साखर अचानक वाढते आणि इंसुलिन ला स्वतःचे कार्य पुरेसे करता येत नाही.
कालांतराने तुमच्या शरीरात इंसुलिन प्रतिकार तयार होते. परिणामी त्याचे रूपांतर टाइप 2 मधुमेह मध्ये होऊ शकते.
८. आजार
विशिष्ट आजार सुद्धा तुमच्यामध्ये टाइप 2 डायबेटिस आजार निर्माण करू शकतात. हार्मोनल विकार जसे की हायपोथायरॉईडीझम (hypothyroidism) आणि कुशिंग सिंड्रोम (Cushing syndrome) हे तुमच्या शरीरात अधिक प्रमाणात हॉरमोनअनियमन करू शकतात.
यामुळे तुमच्या शरीरात कमालीचे हॉरमोन डिस्टर्ब होतात. हे डिस्टर्ब झालेले हॉरमोन तुमच्या इंसुलिन आणि ग्लुकोज शोषण च्या क्रियामध्ये अडथळा आणतात. दीर्घ काळ ही क्रिया चालू राहिल्यावर हळू हळू टाइप 2 मधुमेह साठी अनुकूल स्थिति बनून तुम्हाला टाइप 2 मधुमेह चे लक्षण दिसायला लागतात.
ही सर्व कारणे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या टाइप 2 मधुमेह साठी जबाबदार ठरतात किंवा ट्रिगर करतात.
थोडक्यात
थोडक्यात सांगायचे म्हणजे मधुमेह हा एक क्लिष्ट आजार आहे. त्यामुळे या साठी जबाबदार कारणे ही अनेक आहेत. अगदी अनुवंशीकते पासून तर ते तुमच्या आहारा पर्यंत. ही सर्व कारणे समजून घेऊन तुम्ही मधुमेह विषयी मूलभूत माहिती तर मिळवत आहातच पण ही कारणे समजून घेऊन तुम्ही मधुमेह ला टाळण्याच्या दृष्टीने देखील एक पाऊल उचलत आहात.
टाइप 1 डायबेटिस मध्ये अनुवंशिकता आणि पर्यावरणीय घटक महत्वाची भूमिका बजावतात. यामध्ये आपण फार काही करू शकत नाही. पण टाइप 2 मधुमेह साठी जबाबदार कारणे जसे की व्यायाम न करणे, चुकीचा आहार, लठ्ठपणा हे आपण नियंत्रित करू शकतो. या परिस्थित मध्ये आपण मधुमेह टाळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो.
ब्लॉग मधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेन्ट द्वारे नक्की कळवा.
FAQ’s
डायबेटिस असणाऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे?
डायबेटिस असणाऱ्यांनी विशेष करून दैनंदिन आपली शुगर तपासणी करून घ्यावी, डॉक्टरांचा सल्ल्यानुसार औषधी,व्यायाम आणि आहार चालू ठेवावा.
दुधामुळे शुगर वाढते का?
दुधामुळे शुगर नक्कीच वाढते. कारण दुधामद्धे लैक्टोज नावाची साखर असते.
शुगर झाल्यावर काय खाऊ नये?
शुगर झाल्यावर साखर किंवा गोड पदार्थ, प्रक्रिया केलेल अन्न किंवा इतर पदार्थ, काही फळे जसे केली, सेब, संत्री आणि अधिक कार्बोदके असलेले पदार्थ खाऊ नये.
कोणत्या पदार्थांमुळे मधुमेह होतो?
मधुमेह हा एक क्लिष्ट आजार आहे. मधुमेह होण्यामद्धे अनेक गोष्टी महत्वाची भूमिका बजावतात. यामध्ये विशेष करून गोड पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, अधिक कार्बोदके असलेले पदार्थांमुळे मधुमेह होतो.
कोणते पदार्थ इन्सुलिन सर्वात जास्त वाढवतात?
कोणते पदार्थ इन्सुलिन सर्वात जास्त वाढवतात याचे उत्तर देखील वरील उत्तरातच आहे. अधिक गोड पदार्थ खाल्ल्याने अचानक ग्लुकोज वाढते ज्यामुळे शरीराला अचानक इंसुलिन वाढवावे लागतात
Article reviewed by- Dr. Sachin Ghogare
Owner of healthbuss.
Health expert, professional, consultant and medical practitioner.
Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS).
Working as Community Health Officer.
Maharashtra Council of Indian Medicine Registration number I-92368-A.
Central healthcare professional registry ID 83-2348-4448-2747