HEALTHBUSS

पीसीओडी म्हणजे काय ? All-inclusive and Informative

पीसीओडी म्हणजे काय हा एक मूलभूत आणि काही महिलांना सोपा प्रश्न जरी असला तरी या बद्दल अनेक गैरसमज आणि चुकीची, अर्ध सत्य माहिती त्यांच्याकडे असते. याचे परिणाम तुमच्या आरोग्यावर तर होतोच पण आजाराच्या गंभीरतेवर देखील होतो. चुकीच्या किंवा अर्ध्या माहितीवर अवलंबून राहून बऱ्याच महिला पीसीओडी बाबत चुकीचे निर्णय घेतात.

Contents

या ब्लॉग च्या माध्यमातून पीसीओडी किंवा पीसीओएस सारख्या गंभीर आजाराबद्दल महत्वाची मूलभूत माहिती आणि या आजारबद्दल काही गैरसमज यांची माहिती बघणार आहोत. महिलांमध्ये पीसीओडीची समस्या काय आहे, नेमके पीसीओडी म्हणजे काय किंवा पीसीओडी काय आहे इथपासून ते त्यावर विविध प्रकारचे प्रभावी उपचार याबद्दल ची सविस्तर माहिती या ब्लॉग मध्ये तुम्हाला मिळणार आहे.

नेमके पीसीओडी म्हणजे काय किंवा पीसीओडी काय आहे ?

पीसीओडी (PCOD) म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरी डिसीज. अर्थातच हा एक आजार आहे. महिलांमध्ये होणाऱ्या हॉरमोन असंतुलन मुळे हा आजार होतो. या हॉरमोन च्या असंतुलनामुळे महिलांच्या अंडाशयात अनेक सिस्ट्स (गाठी) तयार होतात. म्हणून याला पॉलीसिस्टिक म्हंटले आहे. पॉलीसिस्टिक म्हणजे एक पेक्षा जास्त गाठी.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार हा आजार जगातील जवळपास ८ ते १३ टक्के प्रजनन क्षम महिलांना होतो. ७० टक्के महिलांना तर आपल्याला हा आजार आहे हे माहीतच होत नाही. म्हणजे एकंदर दोन्ही घटकांची टक्केवारी चा विचार केला तर हे प्रमाण खूप जास्त होते. यावरुण आपण हे लक्षात घेऊ शकतो की पीसीओडी आजार किती सामान्य होत चालला आहे .

भारतामध्ये प्रत्येक पाच महिलांपैकी एक महिला पीसीओडीने ग्रस्त आहे. विशेष करून यामधे २१ ते ३० या वयोगटातील महिलांचा अधिक समावेश असतो.

या पीसीओडी ला काही वेळा पीसीओएस (PCOS) सुद्धा म्हंटले जाते. पीसीओएस (PCOS) म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरी सिंड्रोम. दोन्ही आजार एकच आहेत. फक्त नावे वेगळी आहेत. पण हे दोन्ही नावे नसून संकल्पना आहे असे आपण लक्षात ठेवले तर ते अधिक योग्य होईल. याचे कारण की दोन्ही मध्ये मूलभूत फरक आहे.

PCOD आणि PCOS मध्ये काय फरक आहे?

बऱ्याच महिलांना याबद्दल कन्फ्युजन असते की PCOD आणि PCOS समान आहेत का? याचे साधे आणि सरळ उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असे दोन्ही आहे. असे का हे तुम्हाला पुढे कळेलच.

PCOD आणि PCOS मध्ये काय फरक आहे हे समजावून सांगत असताना त्यामधील महत्वाचे दोन फरक मला तुम्हाला सांगायचे आहेत. त्यानंतर त्याची सविस्तर माहिती जसे की या दोन्ही मधील समानता आणि फरक आपण लक्षणांमद्धे बघूयात.

PCOD आणि PCOS मध्ये महत्वाचे दोन मूलभूत फरक आहेत. ते म्हणजे,

  • PCOD ही खूप मर्यादित किंवा संकुचित आजाराची स्थिति आहे आणि PCOS ही व्यापक संकल्पना आहे.
  • PCOD हा आजार सौम्य मानला जातो. त्या उलट PCOS हा काही अंशी गंभीर आजार आहे.

हे झाले PCOD आणि PCOS मधील मूलभूत दोन फरक. या दोन्ही मध्ये अजून कोणता फरक, समानता आणि लक्षणे दिसतात हे आपन पुढे बघणार आहोत.

PCOD आणि PCOS ची लक्षणे

PCOD आणि PCOS ची लक्षणे

PCOD मध्ये काय होते किंवा PCOS लक्षणे काय आहेत हे समजून घेताना यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी घडतात हे जाणून घेणे महत्वाचे आहे. त्या म्हणजे,

  • अनियमित मासिक पाळी.
  • अंडाशयात सिस्ट्स (गाठी) तयार होणे.
  • अतिरिक्त एंड्रोजन हॉरमोन ची निर्मिती.

तुम्हाला PCOD असो किंवा PCOS, वरील तीनही लक्षणे तुम्हाला प्रामुख्याने या आजारामध्ये आढळतील.

आता PCOD आणि PCOS यामधील फरक, समानता आणि त्या अनुषंगाने या आजारामध्ये आढळणारी इतर लक्षणे यांची माहिती बघूयात.

समानता

  • PCOD आणि PCOS या दोन्ही आजारांमध्ये अनियमित मासिक पाळी असते.
  • दोन्ही आजारांमध्ये स्त्री अंडाशयात छोट्या छोट्या गाठी तयार होतात.
  • दोन्हीमध्ये अतिरिक्त एंड्रोजन हॉरमोन ची निर्मिती बघायला मिळते.

एंड्रोजन हे पुरुष सेक्स हॉरमोन आहेत. टेस्टोस्टेरॉन हॉरमोन पुरुषांमध्ये तयार होणारे एंड्रोजन हॉरमोन चे उदाहरण आहे. हे पुरुष हॉरमोन जरी असले तरी कमी प्रमाणात स्त्रियांमध्ये देखील तयार होत असते. पण PCOD मध्ये हे अधिक प्रमाणात तयार व्हायला लागते, ज्यामुळे या संबंधी इतर लक्षणे जसे केस निर्मिती होणे,अनियमित मासिक पाळी वगैरे दिसतात.

फरक

खाली दिलेला तक्ता बघून तुम्ही PCOD आणि PCOS या दोन्हीमध्ये काय फरक आहे ते बघू शकता.

पीसीओडी (PCOD)पीसीओएस (PCOS)
काही वेळा हा आजार अंडाशयातील गाठी पर्यंत मर्यादित असू शकतो.पीसीओएस हा सिंड्रोम असल्यामुळे याच्या लक्षणांची व्याप्ती अधिक असू शकते.
तुलनेने कमी गंभीर आजार किंवा कमी लक्षणे असणारा आजार आहे.हा अधिक गंभीर असू शकतो आणि लक्षणे देखील अधिक असू शकतात.
यामधे विशेषकरून वजन वाढणे, चेहऱ्यावर मुरूम येणे, केस गळणे, आणि अनावश्यक केसांची वाढ ही लक्षणे दिसतात.यामधे पीसीओडील लक्षणांसोबत वंध्यत्व, इंसुलिन रेसिसटन्स सारखी लक्षणे दिसू शकतात.
योग्य आहार, नियमित व्यायाम, आणि औषधोपचार केल्यास नियंत्रणात ठेवता येतो.यात पीसीओडी मधील उपचारांसहित औषधे, जीवनशैलीत बदल, इंसुलिन-संवेदनशील औषधे, आणि हार्मोनल थेरपीचा समावेश करावा लागू शकतो.
कमी स्त्रियांमध्ये आढळतो.तुलनेने अधिक स्त्रियांमध्ये आढळतो.

थोडक्यात सांगायचे झाले तर PCOD ही संकीर्ण स्थिति आहे आणि PCOS ही त्याच्या पुढची किंवा अधिक व्यापाकता असणारी स्थिति आहे.

पण तरी देखील बहुतेक वेळा या गोष्टी सोबत आढळत असल्यामुळे यांना एकाच परिभाषेत गुंडाळले जाते. याच मुळे या ब्लॉग मधील माहिती ही PCOS आणि PCOD या दोन्ही स्थिति मध्ये लागू असणार आहे.

PCOD किंवा PCOS मध्ये आढळणाऱ्या लक्षणांबाबत महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत. नको त्या लक्षणांना त्या PCOD किंवा PCOSVसोबत जोडतात ज्याचा या आजाराशी काहीही संबंध नसतो. या ब्लॉग च्या निमित्ताने लक्षणे बघत आहोतच तर हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू.

PCOS मुळे पोटाचा त्रास होतो का?

नक्कीच. PCOS मुळे पोटाचा त्रास किंवा पोटदुखी होऊ शकते. हे तुम्हाला PCOS मुळे स्त्री अंडाशयांमध्ये ज्या गाठी तयार झालेल्या असतात त्यामुळे होऊ शकते. काही महिलांना या गाठी मुळे पोटात कळ आल्यासारख्या वेदना होऊ शकतात.

शिवाय PCOS असणाऱ्या महिलांना एंडोमेट्रियोसिस होण्याची शक्यता अधिक राहते. या एंडोमेट्रियोसिस मुळे सुद्धा तुमचे पोट दुखू शकते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान नेहमी पेक्षा जास्त पोटदुखी जाणवत असेल तर त्याविषयी डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.

PCOS मुळे पायांना सूज येऊ शकते का?

PCOS मुळे शरीरातील काही भागांवर सूज येऊ शकते. त्यामुळे पायांना सूज येणे देखील सहाजिक आहे. PCOS मध्ये शरीरातील हॉरमोन असंतुलन होते, त्यामुळे वजन वाढते आणि परिणामी शरीरातील काही भागांवर तुम्हाला सूज झालेली बघायला मिळू शकते.

PCOS मुळे स्तन दुखते का?

PCOS असलेल्या महिलांचे स्तन दुखू शकतात. अगदी एवढे की थोडासा स्पर्श केला की त्याठिकाणी वेदना होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला स्तनांमध्ये वेदना होत असतील आणि त्यासाठी इतर उपाय करून आराम मिळत नसेल तर डॉक्टरांना भेटून PCOS असणे किंवा नसण्याबद्दल खात्री करून घ्या.

PCOS ने तुम्हाला चक्कर येते का?

PCOS मध्ये तुम्हाला चक्कर येऊ शकते. पण चक्कर येणे PCOS मधील साधारण किंवा नॉर्मल लक्षण नाही. हे कदाचित तुमची शुगर पातळी कमी होणे, रक्तदाब कमी होणे, रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणे यामुळे होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा या प्रकारची लक्षणे आढळत असतील तेव्हा इतर शंकांचे निरसन करणे गरजेचे आहे.

PCOS मुळे हृदय गती कमी होते का?

PCOS मुळे महिलांच्या हृदय गतीवर काही परिणाम होतो याचे अजून काही प्रमाण नाही. पण PCOS मुळे आढळणारे लक्षण जसे की वजन वाढणे, इंसुलिन रेसिसटन्स आणि इतर लक्षणांमुळे ह्रदय गतीवर परिणाम होऊ शकतो. पण PCOS किंवा PCOD आणि ह्रदयगती (हार्ट रेट) यांचा सरळ संबंध आहे असे कुठे ही सिद्ध झालेले नाही.

PCOS मुळे केस गळतात का ?

केस गळती होण्याचे तसे अनेक कारणे आहेत. पण तुम्हाला अनियमित मासिक पाळी, वजन वाढणे या लक्षणांसोबत सोबत जर केस गळत असतील तर त्याचे कारण हे PCOS किंवा PCOD असू शकते. त्यामुळे तुमचे केस गळत असतील तर या बाबतीत तुम्ही सर्व बाबींचा विचार करून त्यावर उपचार घेणे आवश्यक आहे.

PCOD मध्ये विशेषकरून माथ्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला केस गळती दिसेल. दुसरे म्हणजे केस घनता कमी होऊ शकते किंवा पातळ होऊ शकतात.

PCOS मुळे त्वचेला खाज येते का ?

PCOS मुळे तुमच्या त्वचेला खाज सुद्धा सुटू शकते. एवढेच नाही तर कोरडी आणि सूजलेली त्वचा सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकते. PCOS आणि त्वचा विकार यांचा काही संबंध नाही. पण काही रिसर्च सांगतात की PCOS मुळे त्वचा विकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रिसर्च मध्ये PCOS आणि त्वचा विकार यांचा संबंध स्पष्ट केलेला आहे.

किंबहुना २०१६ च्या या अभ्यासात PCOS असलेल्या ४०० महिलांपैकी ९२ टक्के महिलांमध्ये किमान एक त्वचा विकार आढळलेला आहे. त्यामुळे त्वचेला खाज येत असेल आणि मासिक पाळी संबंधित इतर लक्षणे जाणवत असतील तर तुम्हाला PCOS चे निदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

PCOS मुळे डोक्यातील कोंडा होतो का?

PCOS मुळे डोक्यातील कोंडा होत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. पण PCOS अनेक महिलांना डोक्यातील केस गळतीव्यतिरिक्त कोंडा होण्याच्या समस्या देखील दिसून आलेल्या आहेत.

PCOS किंवा PCOD च्या लक्षणांबद्दल काही महिलांमध्ये असणारे हे काही गैरसमज, जे मी दूर करण्याचा प्रयत्न केला. ब्लॉग मध्ये आता PCOD बद्दल इतर महत्वाची माहिती बघूया.

PCOD का होतो किंवा PCOD चे कारण काय आहे ?

PCOD होण्याचे ठोस कारण किंवा या आजाराच्या कारणांची ठोस माहिती अद्याप मिळालेली नाही. यावर संशोधन कदाचित चालू असेल. पण या बाबतीत काही घटक महत्वाची भूमिका बजावतात असे काही अभ्यासात सिद्ध झाले आहे. त्याचा विचार आपण इथे करणार आहोत.

१. आनुवंशिकता

PCOD किंवा PCOS हा अनुसवंशीक आजार आहे. म्हणजे तुमच्या घरातील इतर सदस्यांना हा आजार असेल तर तुम्हाला देखील होण्याची शक्यता राहते. PCOS हा अनुवंशीक असल्याचे अनेक पुरावे देखील उपलब्ध आहेत. २००६ मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार आनुवंशिक आणि पर्यावरण हे दोन्ही घटक PCOS मध्ये महत्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट आहे.

२. इंसुलिन प्रतिरोध

इंसुलिन प्रतिरोध म्हणजे इंसुलिन रेसिसटन्स. अनेक जणांनी हा शब्द ऐकला असेल. मधुमेह च्या बाबतीत इंसुलिन रेसिसटन्स महत्वाची भूमिका बजावत असते. पण PCOS मध्ये देखील इंसुलिन प्रतिरोध ची महत्वाची भूमिका असते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित आर्टिकल नुसार PCOS ची समस्या असणाऱ्या ७० टक्के महिलांना इंसुलिन रेसिसटन्स असल्याचे निष्पन्न झाले आहे.

३. लठ्ठपणा

तुमचा लठ्ठपणा किंवा वाढलेले वजन हे PCOS आजाराला आकर्षित करू शकते. PCOS साठी लठ्ठपणा हे महत्वाचे कारण आहे. कारण वाढलेले वजन हे इंसुलिन रेसिसटन्स, ह्रदयाचे आजार. मानसिक तणाव आणि यातून मग पुन्हा मासिक पाळी वर परिणाम होणे, या गोष्टी चालू राहून यांचे एक चक्र बनत राहते. शिवाय तुमचे वजन जास्त असेल तर तुमच्या शरीरात इन्फ्लेमेशन वाढत जाते. अभ्यासानुसार या इन्फ्लेमेशन (क्रॉनिक इन्फ्लेमेशन) मुळे अतिरिक्त अँड्रोजन हॉरमोन ची निर्मिती बघायला मिळते.

या सर्व स्थितीमुळे PCOS साठी एक पोषक स्थिति बनून त्या संबंधी लक्षणे दिसायला सुरुवात होते.

पीसीओडी च्या अनेक संभाव्य कारणांपैकी हे तीन महत्वाचे कारणे आहेत. पण या व्यतिरिक्त देखील काही कारणे असू शकतात जे अजून स्पष्ट नाहीत. म्हणून कारणांचा अधिक विचार न करता जर तुम्हाला पीसीओडी तील कोणतेही लक्षण दिसत असेल तर त्यावर लवकर मार्गदर्शन आणि उपचार घेणे गरजेचे आहे.

PCOD बरा होऊ शकतो का ?

PCOD पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. आतापर्यंत तरी यावर खात्रीपूर्ण आणि कायमस्वरूपी असा कोणताही उपचार नाही. यासाठी दोन कारणे महत्वाचे ठरतात असे मला वाटते.

  • हा आजार होण्याचे निश्चित कारण अद्याप पर्यन्त स्पष्ट नाही. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपचार शोधण्यास अनेक समस्या आहेत.
  • दुसरे कारण म्हणजे हा एक चिरकालीन, गुंतागुंतीचा होरमोनल आजार आहे.

PCOD पूर्णपणे बरा होऊ शकत नसला तरी त्याची लक्षणे आणि आजाराची तीव्रता कमी करता येते. याचा अर्थ असा की या आजारामुळे तुम्हाला जी लक्षणे दिसतात, त्यावर उपचार देऊन त्यांचे व्यवस्थापन करून आजाराची तीव्रता कमी करता येते. त्यामुळे आजार पूर्णपणे बरा जरा होत नसेल तरी PCOD किंवा PCOD असणाऱ्या महिलांना लक्षणांवर उपचार घेऊन सामान्यांसारखे आयुष्य नक्कीच जागता येते.

PCOD कसा बरा होऊ शकतो?

PCOD मधील लक्षणे कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे उपचार केले जातात. हे सर्व उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे लागतात. याची सर्वसाधारण माहिती बघूया.

  • आहार : तुमच्या आहारामध्ये सकारात्मक बदल केल्यास इंसुलिन रेसिसटन्स, वजन वाढणे, हॉरमोन बॅलेन्स नसणे ही लक्षणे कमी होतात. यासाठी जास्त प्रथिने, फायबर आणि कार्ब असणारा आहार घेणे महत्वाचे आहे.
  • व्यायाम: दैनंदिन व्यायाम आणि शक्य तेवढ्या जास्त शारीरिक हालचाली तुमचे वजन कमी करण्यासाठी आणि परिणामी इंसुलिन प्रतिरोध कमी करण्यास मदत करतात. यासाठी योगा, कार्डियो एक्झरसाइज, स्ट्रेन्थ एक्झरसाइज करू शकता.
  • औषधोपचार: PCOD मध्ये अनियंत्रित आणि असंतुलीत झालेले तुमचे हॉरमोन हे औषधोपचार देऊन बॅलेन्स केले जातात. ही होरमोनल औषधी असतात. म्हणून होरमोनल थेरपी म्हंटले जाते.
  • तणाव व्यवस्थापन- तणाव, नैराश्य सारखे मानसिक विकार तुमच्या मासिक पाळी वर परिणाम करून हॉरमोन असंतुलित करतात. शिवाय यामुळे वजन सुद्धा वाढते. परिणामी, PCOD होण्याची शक्यता वाढत जाते. त्यामुळे ध्यान, योगा आणि इतर विश्रांती देणाऱ्या पद्धती यांचा सराव करणे हे तुमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग असला पाहिजे.

अशा पद्धतीने तुमचे डॉक्टर PCOD साठी उपचार सुचवतात आणि PCOS ची लक्षणे बरी करतात. अर्थातच हे सर्व उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने चालू करायचे आहे.

संबंधित वाचा- पीसीओडी साठी आयुर्वेद उपचार काय आहेत ?

PCOD मधून बरे होण्यासाठी किती वेळ लागतो?

PCOD पूर्णपणे बरा होऊ शकत नाही हे तर तुम्ही जाणून घेतले आहे. त्यामुळे PCOS बरा होण्यासाठी किती महिने लागतात किंवा किती कालावधी मध्ये PCOS बरा होऊ शकतो हा प्रश्नच दिशाभूल करणारा ठरेल.

पण जस वर सांगितले की या आजाराची लक्षणे आणि तीव्रता कमी करता येते ज्यामुळे तुम्ही एक सामान्य स्त्रियांसारखे आयुष्य घालवू शकता. उपचार चालू केल्यानंतर साधारण ४ ते ८ महिन्यांमध्ये तुमचे PCOS किंवा PCOD ची लक्षणे बरी होऊ शकतात.

अर्थातच प्रत्येकासाठी हा कालावधी वेगवेगळा असू शकतो. आजाराची गंभीरता, कोणती लक्षणे दिसतात, रुग्णाची प्रतिकारक्षमता या घटकांवर लक्षणे बरी होण्यासाठीचा कालावधी अवलंबून असतो.

थोडक्यात

शेवटी काय तर PCOS किंवा PCOD हा जवळपास एकच आजार आहे. दोन्ही आजारांमध्ये हार्मोनल असंतुलन, मासिक पाळी अनियमित होणे, गाठी तयार होणे या समस्या दिसतात. तरी सुद्धा वेगवेगळ्या माहिलांमध्ये या लक्षणांची तीव्रता आणि संख्या कमी अधिक असू शकते. याच लक्षणांचा विचार करून डॉक्टर तुम्हाला यावर उपचार सुचवतात.

साधारण उपचार किंवा लक्षणे कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणाव व्यवस्थापन हे तीन घटक सर्व PCOS किंवा PCOD असलेल्या महिलांना गरजेचेच आहे. योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे PCOD/PCOS मधील लक्षणे कमी होऊ शकतात आणि आरोग्य सुधारता येते.

शेवटी, PCOD/PCOS असलेल्या महिलांना मी एवढंच सांगेल की तुमच्या आरोग्याचा ताबा घ्या, योग्य माहिती मिळवा, आणि उपचारांसाठी योग्य पावले उचला. तुमच्या आत्मविश्वास आणि संयमाच्या जोरावर तुम्ही नक्कीच या समस्येवर मात करू शकता.

ब्लॉग मधील माहिती आवडली असेल तर कमेन्ट करून नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ’s

PCOS ने गर्भवती होण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो?

PCOS ने गर्भवती होण्यासाठी किती वेळ लागेल हे रुग्णाचे वय, आजाराची तीव्रता, लक्षणे आणि उपचारांना रुग्णांचा प्रतिसाद यावर अवलंबून असेल.

PCOS रुग्ण गर्भवती होऊ शकतो का?

PCOS महिला रुग्ण गर्भवती होऊ शकतात. पण यामधे त्यांना बरीच आरोग्य विषयक आव्हाने येतील. त्यापैकी एक म्हणजे मासिक पाळी चे. PCOS असलेल्या महिलांना नियममीत मासिक पाळी होत नाही ज्यामुळे ovulation ही प्रक्रिया होत नाही. अशा परिस्थितिमध्ये गर्भधारणा होण्याची शक्यताच राहात नाही.

PCOS नंतर केस परत वाढतात का?

PCOS नंतर गेलेले केस कधीच आपणहून परत येत नाही. पण योग्य उपचार आणि सकारात्मक जीवनशैली ठेवल्यास केस परत येऊ शकतात.

PCOS मध्ये गर्भधारणा कशी करावी?

PCOS मध्ये गर्भधारणा होऊ शकते. यासाठी वजन, ब्लड शुगर लेवल नियंत्रित ठेवणे, औषधोपचार आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल या गोष्टींची काळजी घेतली तर गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.

PCOS मुळे गर्भपात होण्याचा धोका वाढतो का?

PCOS आजार असलेल्या महिलांना नेहमी गर्भपात होण्याचा धोका असतो. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ अँड ह्यूमन डेवलपमेंट नुसार PCOS असलेल्या महिलांमध्ये PCOS नसलेल्या महिलांपेक्षा सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये गर्भपात होण्याचा धोका ३ पटीने वाढतो

Leave a Comment