Last updated on May 15th, 2024 at 03:57 pm
ह्रदयाचे आरोग्य राखणे हे आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आजच्या या धावपळीच्या दिवसांमध्ये ह्रदय विकार होण्याचे प्रमाण अतिशय वाढलेले दिसत आहे. पण तो ह्रदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात (Medicines used to prevent Heart Attack) या बाबत एक सामान्य माहिती सामान्य व्यक्तींना माहीतच असावी.
हाच उद्देश ठेवून या विषयावरील ब्लॉग बनवण्याचे मी ठरवले.
ह्रदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात असे बरीच रुग्ण ओपिडी मध्ये आल्यावर विचारत असतात. पण याचे उत्तर देत असताना संकोच असतो. कारण असे आहे की रुग्णांनी स्वतः आणि मनाने, डॉक्टरांचा सल्ला न घेता या औषधांचा उपयोग केला तर त्यांच्या आरोग्या साठी धोका ठरू शकतो.
पण दूसरा एक विचार असा ही आहे की एक रुग्ण म्हणून त्यांची देखील काहीतरी जबाबदारी, कर्तव्य आहेत. कोणती औषधे आहेत, ती कशी काम करतात वगैरे याबद्दल तांत्रिक नाही पण एक साधारण आणि मूलभूत माहिती असणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
चला तर ह्रदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणती औषधे वापरतात याची थोडक्यात पण एक रुग्ण म्हणून जी माहिती असावी ती जाणून घेऊ या.
हार्ट अटॅक टाळण्यासाठी कोणती औषधे वापरतात असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्हाला ह्रदयविकार संबंधित अजून दोन मुद्यांची माहिती असणे गरजेचे आहे.
हे दोन मुद्दे समजल्यावर तुम्हाला ह्रदय विकार येऊ नाही यासाठी जी औषधी वापरली जातात, ती कशी काम करतात याची देखील कल्पना येईल. या दोन मुद्यांचा विचार आपण शेवटी करुयात.
जाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात ?
१. ऍस्पिरिन (Aspirin)
ह्रदय विकाराचा धोका टाळण्यासाठी व्यापक प्रमाणात वापरले जाणारे आणि अत्यंत प्रभावी असे हे ऍस्पिरिन (Aspirin) औषध आहे. ही औषधी अँटीप्लेटलेट (Antiplatelets) या वर्गामध्ये मध्ये येते. याचे कारण की ही औषधी प्लेटलेट्स च्या विरोधात काम करते. आता प्लेटलेट्स काय आहे ते बघूया.
प्लेटलेट (platelets) हा एक रक्त पेशींचा प्रकार आहे. जसे पांढऱ्या पेशी वगैरे इतर प्रकार आहेत. या प्लेटलेट्स चे काम काय असते ते जाणून घेऊया.
जेव्हा आपल्याला एखादी जखम होते किंवा व्रण होतो तेव्हा काही रक्त बाहेर पडते. हा रक्तप्रवाह काही वेळ चालू राहतो. काही वेळेच्या अंतराने हा रक्तप्रवाह आपोआप थांबतो. होते असे की रक्तप्रवाह चालू आहे असे संकेत शरीराला भेटत असतात तेव्हा शरीरातील यंत्रणा कार्यान्वित होते आणि रक्तप्रवाह थांबवण्यासाठी प्रयत्न चालू होतात.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून जिथे जखम झाली आहे आणि रक्तप्रवाह चालू आहे अशा ठिकाणी या प्लेटलेट पेशी जमा होतात आणि रक्त गोठवतात. या प्रक्रियेला Blood Clotting असे म्हणतात. रक्त गोठल्यामुळे शरीराबाहेर होणारा रक्त प्रवाह थांबतो. पण लक्षात असू द्या की ही रक्त गोठण्याची प्रक्रिया फक्त शरीराबाहेर होणाऱ्या रक्तप्रवाह साठी चांगली असते. शरीरामधील चालू असणारा रक्तप्रवाह हा कोणताही व्यत्यय न येता चालूच राहिला पाहिजे.
आता प्लेटलेट्स म्हणजे काय आपण बघितले.
यानंतर प्लेटलेट्स ची ह्रदयविकार संबंधी काय भूमिका आहे ते बघूया.
आपल्या अनेक चुकीच्या सवयीमुळे जसे की तेलकट पदार्थ खाणे, जास्त प्रमाणात सोडियम सेवन करणे, व्यायाम (exercise) न करता बसून राहणे इत्यादि यामुळे शरीरातील रक्तामद्धे फॅट आणि कॉलेस्ट्रॉल (Cholesterol) जमा होते आणि यामुळे आपले रक्त घट्ट बनायला लागते. कालांतराने या रक्तामध्ये गाठी (Clots) तयार होतात.
या गाठी तयार झाल्या म्हणजे रक्त गोठले असे समजावे आणि आपण बघितले की रक्त गोठण्यासाठी प्लेटलेट्स किती महत्वाची भूमिका बजावतात. आता या तयार झालेल्या रक्ताच्या गाठी जेव्हा ह्रदयाच्या एखाद्या भागामध्ये जाऊन ह्रदयाला होणारा रक्तपुरवठा थांबवतात तेव्हा आपल्याला ह्रदयविकार होतो.
सांगायचे तात्पर्य म्हणजे या सर्व घटना रक्त गोठल्यामुळे होतात आणि रक्त गोठण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात त्या प्लेटलेट्स पेशी. तेव्हा या प्लेटलेट्स च्या विरोधी कर्म करणारे औषध म्हणजे ऍस्पिरिन. ऍस्पिरिन रक्त गोठण्याचे कार्य थांबवते ज्यामुळे गाठी तयार होण्याचा धोका कमी होतो.
ही औषधी मेडिकल मध्ये Ecosprin, Desprin, Loprin, Delisprin आणि इतर अनेक नावाने उपलब्ध आहे.
२. बीटा-ब्लॉकर्स (Beta Blockers)
ह्रदय रोग संबंधित आजार जसे उच्च रक्तदाब आणि हृदयविकार येऊ नये यासाठी उपयोगी बेटा ब्लॉकर्स (Beta Blockers) हा औषधांचा एक वर्ग आहे. हे औषध हृदय संबंधित उच्च रक्तदाब, ह्रदयाचे ठोके असे महत्वाचे घटक नियंत्रित करण्यासाठी उपयोगी ठरते.
उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित ह्रदयाचे ठोके हे ह्रदय विकार येण्यासाठी कारणीभूत घटक असतात. ज्या व्यक्तींना या समस्या आहेत अशा व्यक्तींना ह्रदयविकार होण्याची शक्यता अधिक असते. हेच घटक नियंत्रित ठेवण्यासाठी या बेटा ब्लॉकर्स औषधांचा उपयोग केला जातो.
या बद्दल थोडी अधिक माहिती जाणून घेऊया.
वाईट सवयीमुळे शरीरामध्ये छोट्या छोट्या स्तरांवर काही बदल होतात ज्यामुळे ह्रदयाचे ठोके अनियंत्रित होणे, रक्तदाब वाढणे अशा समस्या उत्पन्न होतात. या दोन्ही घटना ह्रदयावरील ताण वाढवतात तसेच ह्रदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित करतात.
दीर्घ काळासाठी या समस्या ह्रदयाचे जबरदस्त नुकसान करतात ज्यामुळे ह्रदयाच्या पेशी क्षतिग्रस्त होतात, ह्रदय अकार्यक्षम होते आणि ह्रदयांचे स्नायू कमजोर होतात. या सर्व गोष्टी एक ह्रदयविकाराचा झटका येण्यासाठी सरळ कारणीभूत ठरतात. यासाठी ह्रदयाचे ठोके आणि उच्च रक्तदाब नियंत्रित असणे हे ह्रदय विकाराचा झटका टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचे घटक आहेत.
बेटा ब्लॉकर्स या औषधी वर्गाच्या अंतर्गत अनेक औषधी येतात. ही औषधी मेडिकल मध्ये propranolol, atenolol, carvedilol या नावाने उपलब्ध असत.
या सर्व औषधांची कार्य एकच आहे. या औषधी वर्गाचा डोस रुग्णाची स्थिति, आजार आणि इतर अनेक गोष्टींचा विचार करून डॉक्टर ठरवत असतात.
३. एसीई इनहिबिटर्स (ACE Inhibitors)
ह्रदय रोग संबंधित काही आजारांची चिकित्सा आणि ह्रदयविकार टाळण्यासाठी वापरण्यात येणारा एसीई इनहिबिटर्स (ACE Inhibitors) हा सुद्धा एक औषधी वर्ग आहे. या अंतर्गत देखील अनेक औषधी येतात. सर्वांची कार्य हे कमी अधिक प्रमाणात सारखीच आहेत.
या औषधांचे महत्वाचे कार्य म्हणजे उच्च रक्तदाब कमी करणे. विशेष करून ज्यांचा अति उच्च रक्तदाब आहे त्यांच्यासाठी या औषधीचा फायदा अधिक होतो. शरीरातील अनेक बदल घडवून ही औषध उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करते.
उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्या व्यतिरिक्त एकंदरीत ह्रदयाचे आरोग्य चांगले ठेवणे, ह्रदयाची कार्यक्षमता अबाधित ठेवणे असे अनेक प्रकारचे कार्य ही औषध करू शकते.
एसीई इनहिबिटर्स च्या कार्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
- ही औषधे रक्तवाहिन्या शिथिल आणि रुंद करतात ज्यामुळे रक्तवाहिन्यांमद्धे रक्तामुळे येणारा दबाव कमी होतो. यामुळे उच्च रक्तदाबासारखी स्थिति या औषधामुळे कमी होते.
- ह्रदयांच्या स्नायूंचे कार्य या औषधामुळे सुधारते. या मुळे ह्रदयावरील अतिरिक्त भार कमी होऊन ह्रदयाची कार्यक्षमता वाढते.
- LVH या आजारामध्ये ह्रदयाच्या भिंतीच्या स्नायूंची जाडी वाढते आणि सुजते. यामुळे ह्रदयावरील अतिरिक्त भार येऊन ह्रदयाचे नुकसान होऊ शकते. हे औषध वाढलेली स्नायूंची जाडी कमी करतात ज्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत चालू राहते.
- अनेक रासायनिक प्रक्रिया आणि तणावामुळे रक्तप्रवाह करणाऱ्या रक्तवाहिन्या नाजुक आणि क्षतिग्रस्त होतात. यामुळे याचा परिणाम ह्रदयावर सुद्धा होतो. एसीई इनहिबिटर्स या रक्तवाहिन्यांना नुकसान होण्यापसून त्यांचे संरक्षण करतात.
मेडिकल मध्ये ही औषधे अनेक नावांनी ओळखली जातात. जास्त प्रचलित ब्रॅंडस म्हणजे ramipril, captopril, lisinopril या तसेच इतर नावाने देखील ही औषधी उपलब्ध आहेत.
अनेक ह्रदय संबंधित आजार, किडनी संबंधित आजार यामध्ये या औषधाचा उपयोग होतो. त्यामुळे ज्या उपयोगासाठी ही औषध वापरले जाणार त्यानुसार डॉक्टर याचा डोस ठरवतात.
४. क्लोपीडोग्रेल (Clopidogrel)
ऍस्पिरिन सारखीच कार्य असणारी ही एक औषधी ह्रदयविकाराचा झटका टाळण्यासाठी उपयुक्त ठरते. ऍस्पिरिन या औषधाबरोबर कधीकधी क्लोपीडोग्रेल (Clopidogrel) ही औषधी देखील दिल्या जाते.
ही औषधी रक्ताची गाठ किंवा गुठळ्या तयार होण्यासाठी जबाबदार प्लेटलेट्स यांचे कार्य थांबवते आणि रक्ताच्या गाठी होण्यापासून थांबवते. या औषधीचा उपयोग विशेषता ज्यांनी त्यांच्या ह्रदयामद्धे स्टेंट (stents) बसवले असतात त्यांना होतो.
स्टेंट हे बारीक जाळीसारख्या नळया असतात ज्या ह्रदयातील रक्तवाहिन्यामद्धे बसवल्या जातात. यामुळे रक्तवाहिन्या रूंद होतात आणि तेथील रक्तदाब कमी होतो. बहुतेक वेळा हे स्टेंट प्लेटलेट्स ना आमंत्रित करू शकतात आणि रक्त घट्ट करू शकतात. अशा परिस्थितिमध्ये या रुग्णांना क्लोपीडोग्रेल हे औषध डॉक्टरांकडून दिल्या जाते.
क्लोपीडोग्रेल ही औषधी Clopicard, Clopitab, Plagerine आणि अशा इतर ब्रॅंडस मध्ये उपलब्ध आहे.
हार्ट अटॅक येण्याचे लक्षण
याआधी आपण हार्ट अटॅक न येण्यासाठी मदत करणारी काही औषधे बघितली आहेत. या प्रकरणात हार्ट अटॅक संबंधित इतर महत्वाची माहिती आता बघणार आहोत.
ह्रदय विकाराचा झटका जेव्हा येतो तेव्हा तुमच्या शरीरामध्ये काही बदल होत असतात जे तुम्हाला ठळक पणे जाणवू शकतात. त्याला आपण ह्रदयविकाराचे लक्षण म्हणूयात. ही हार्ट अटॅक येत असतानाची लक्षणे विविध प्रकारची आणि वेगवेगळ्या प्रमाणात जाणवू शकतात. यामुळे यामधील कोणतीही आणि किती ही लक्षणे जाणवली तर तुम्ही याबद्दल सर्व खबरदारी घेण्यास सुरुवात करायची आहे.
- छातीत अस्वस्थता किंवा वेदना: अनेकदा छातीत घट्टपणा, दाब, पिळणे किंवा जडपणा येणे असे लक्षणे दिसतात.
- इतर भागात वेदना किंवा अस्वस्थता: यात हात (विशेषतः डावा हात), जबडा, मान, पाठ किंवा पोट या ठिकाणी वेदना होऊ शकतात.
- श्वास लागणे: दम लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.
- थंड घाम: अचानक घाम येणे.
- मळमळ किंवा उलट्या: छातीत जळजळ होणे, मळमळ झाल्यासारखी वाटणे. काही वेळा उलटी सुद्धा होऊ शकते.
- हलके डोके वाटणे किंवा चक्कर येणे: चक्कर येणे किंवा डोके हलके वाटणे, काही वेळा चक्कर सुद्धा येऊ शकते.
- थकवा: असामान्य थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.
हार्ट अटॅक कशामुळे येतो
ह्रदयविकार किंवा हार्ट अटॅक येणे हा रक्तवाहिन्या मध्ये अडथळे, ह्रदयाला रक्तप्रवाह कमी होणे, ह्रदयाच्या स्नायूंना नुकसान होणे आणि अशा ह्रदयसंबंधीत आणि रक्तवाहिन्या संबंधित अनेक घटकांमुळे होणारे बदल याचा एकंदर परिणाम आहे.
पण हार्ट अटॅक येतो म्हणजे नेमके काय होते ते बघूया.
हृदय पूर्ण आणि चांगल्या क्षमतेने काम करण्यासाठी हृदयाचे स्नायू महत्वपूर्ण भूमिका बजावतात. या स्नायूंचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या स्नायूंना व्यवस्थित रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा होणे आवश्यक असते. त्यामुळे ह्रदयाला रक्तपुरवठा करण्यासाठी देखील ह्रदयाच्या आतमधील भागात काही धमन्या असतात ज्या फक्त ह्रदयाला आणि ह्रदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करण्यासाठी असतात.
पण काही कारणामुळे जसे की धमन्या बारीक होणे आणि रक्ताच्या गाठी तयार होणे, यामुळे एकूणच ह्रदयाला आणि तेथील स्नायूंना व्यवस्थित आणि पूर्णपणे रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा होऊ शकत नाही. अशा परिस्थिति मध्ये ह्रदयातील स्नायू आणि पेशी मृत पावतात किंवा त्यांना क्षती पोचते.
याचा एकंदर परिणाम म्हणजे ह्रदयाला ऑक्सिजन पुरवठा होत नाही. अशी परिस्थिति जेव्हा निर्माण होते तेव्हा छाती दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ होणे आणि इतर लक्षणे जाणवू लागतात.
या घटनेला आपण ‘ह्रदयविकार’ किंवा ‘हार्ट अटॅक’ आला असे म्हणतो.
या सर्व प्रक्रियेमद्धे गाठी तयार होणे, रक्तवाहिन्या बारीक होणे हे महत्वाचे घटक जबाबदार ठरतात. आता बघूया काय केल्याने शरीरामध्ये या गोष्टी उद्भवतात.
हार्ट अटॅक येण्याची कारणे
१. धूम्रपान
तंबाखूचा वापर, धूम्रपान हे घटक रक्तवाहिन्यांना नुकसान करतात. तसेच रक्तातील ऑक्सिजन कमी करून आणि धमनीमध्ये गाठी तयार होण्यास प्रोत्साहन देऊन हृदयरोग आणि हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढवतात.
२. उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाबामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर ताण आणि दबाव येतो, ज्यामुळे त्यांना नुकसान होण्याची शक्यता वाढते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
३. कोलेस्टेरॉल
एलडीएल (खराब) कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी आणि एचडीएल (चांगले) कोलेस्टेरॉलची कमी पातळी रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक म्हणजेच गाठी तयार करण्यास मदत करतात. तसेच त्यांना अरुंद करण्यास आणि रक्तप्रवाहात अडथळा आणण्यास कारणीभूत ठरू शकतात.
४. लठ्ठपणा
जास्त वजन विशेषत: कंबरेभोवती मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या कारणांचा धोका वाढवू शकता.
५. मधुमेह
अनियंत्रित मधुमेह रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंना नुकसान पोहचवतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
६. कमी शारीरिक हालचाली
बैठी जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या इतर सर्व आरोग्य समस्या वाढतात.
७. आहार
फॅट्स, कोलेस्टेरॉल, सोडियम आणि शर्करायुक्त आहारामुळे प्लेक (गाठी) तयार होण्यास मदत होते आणि हृदयविकारास कारणीभूत ठरू शकते.
तात्पर्य
या ब्लॉग चा उद्देश फक्त सर्व सामान्य लोकांपर्यंत सोप्या पद्धतीने माहिती पोचवणे एवढाच आहे. ब्लॉग वाचून कोणता उपचार घेऊ नका किंवा चालू असलेला उपचार बदलू नका. शेवटी आरोग्य हा सतत बदलणारा आणि प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हा वेगळा घटक आहे. त्यामुळे प्रत्येक उपचाराचा देखील परिणाम व्यक्तिनुसार बदलू शकतो.
ब्लॉग मध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर कमेन्ट द्वारे नक्की कळवा. धन्यवाद.
FAQ’s
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुम्हाला किती काळ लक्षणे दिसू शकतात?
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुम्हाला काही मिनीटे आधी किंवा काही दिवस अधिपर्यंत लक्षणे दिसू शकतात.
हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काय करावे?
हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून तुम्हाला निरोगी जीवन जसे चांगला आहार, सवयी, मानसिक आरोग्य जपावे लागेल.
हृदयविकाराचा झटका किती काळ टिकतो?
हृदयविकाराचा झटका काही मिनीटे ते काही तासपर्यंत टिकू शकतो.
मी माझे हृदय कसे मजबूत करू शकतो?
ह्रदय मजबूत ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, निरोगी आहार, तणाव मुक्त जीवन आणि व्यसनापासून दूर राहावे लागेल.
हृदय वेदना कशासारखे वाटते?
हृदय वेदना छातीत दाब दिल्यासरखे वाटते. काही वेळेस जळजळ झाल्यासारखी वेदना असू शकते.
Article reviewed by- Dr. Sachin Ghogare
Owner of healthbuss.
Health expert, professional, consultant and medical practitioner.
Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS).
Working as Community Health Officer.
Maharashtra Council of Indian Medicine Registration number I-92368-A.
Central healthcare professional registry ID 83-2348-4448-2747
3 thoughts on “हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात ? (Medicines used to prevent Heart Attack)”