Last updated on April 9th, 2024 at 11:37 am
(अनियमित मासिक पाळी, महिन्यातून दोनदा मासिक पाळी येणे, 15 दिवसांनी मासिक पाळी येणे)
मासिक पाळी ही सरासरी २८ दिवसांची असते. पण काही महिलांमध्ये याबाबतीत काही बदल बघायला मिळतात आणि जे सामान्य आहेत. ही २८ दिवसांची मासिक पाळी काही महिलांमध्ये २२ ते ३८ दिवसांपर्यंत मागे पुढे होऊ शकते. या बाबतीत महिलांना देखील आता योग्य अशी माहिती झालेली आहे.
पण काहींना महिन्यातून दोनदा मासिक पाळी येते. म्हणजे १५ दिवसांनी मासिक पाळी येते. त्यामुळे महिला याविषयी खूप चिंता करत असतात. असो.
या सर्व मासिक पाळी विषयी समस्यांना अनियमित मासिक पाळी म्हणतात.
महिन्यातून दोनदा मासिक पाळी येणे किंवा १५ दिवसांनी मासिक पाळी येणे ही सामान्य असू शकते, तसेच काही गंभीर आजाराचे देखील हे लक्षण असू शकते. याच बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग वाचावा लागणार आहे.
मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे समजून घेत असताना ही गंभीर समस्या आहे की नॉर्मल आहे हे तुम्हाला समजून घेण्यासाठी मदत होणार आहे.
थोडक्यात
मासिक पाळी ही महिलांच्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक आहे. या मासिक पाळी बद्दल तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. या गोष्टी समजून घेतल्यावर तुम्हाला मासिक पाळी १५ दिवसांनी येण्याचे कारणे समजायला सोपे जाईल.
- मासिक पाळी ही संपूर्णता अनेक प्रकारच्या हॉरमोन्स च्या खेळीचा परिणाम आहे. या सर्व गोष्टी खूप क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या असतात.
- ही सर्व गुंतागुंतीची स्थिति मासिक पाळी च्या अनेक घटकांवर परिणाम करत असते.
- हे हॉर्मोन्स अनेक घटकांमुळे कमी जास्त होत राहतात, त्यामुळे त्याचा परिणाम मासिक पाळी वर होणे देखील सहाजिक आहे.
- कोणते हॉरमोन कधी आणि किती प्रमाणात तयार होतील हे संपूर्णता वय, शारीरिक स्थिति, मानसिक स्थिति तसेच इतर काही आजारांवर देखील अवलंबून असते.
- या सर्व गोष्टींचा परिणाम मासिक पाळी कधी चालू होते, या दरम्यान किती स्त्राव होईल, मासिक पाळी किती दिवस उशिरा होते, मासिक पाळी कधी थांबेल या सर्व गोष्टी अवलंबून असतात.
या सर्व गोष्टींचा विचार करता मी जे मासिक पाळी १५ दिवसांनी येण्याचे कारणे सांगणार आहे त्या सर्व गोष्टींचा परिणाम या हॉर्मोन्स वर होत असतो. काही वेळा उलट देखील होते, जस की हॉर्मोन्स चा परिणाम या सर्व गोष्टींवर होत असतो.
या विषयाच्या बाबतीत तुम्हाला अजून एक गोष्टी माहिती हवी. महिन्यातून दोनदा मासिक पाळी येणे म्हणजेच काहींची मासिक पाळी ही कमी दिवसाची असू शकते. जसे की अगोदर मी सांगितले की २२ ते ३८ दिवसांपर्यंत मासिक पाळी ही कमी जास्त होऊ शकते.
अशा वेळी हे नॉर्मल आणि सामान्य असू शकते. पण सतत आणि दर महिन्याला असे होत असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला यासाठी घ्यावा लागणार आहे.अशा वेळी डॉक्टर तुम्हाला खरंच महिन्यातून दुसऱ्यांदा मासिक पाळी आली आहे का, की होणारा रक्तस्त्राव हा इतर काही कारणामुळे आहे हे तपासून त्यासंबंधीचे निदान आणि उपचार ठरवतील.
१५ दिवसांनी मासिक पाळी येण्याचे कारणे : (सुरक्षित, नॉर्मल, सहाजिक)
१. गर्भधारणा
गर्भधारणा झाल्यावर म्हणजेच प्रेगनंसी मध्ये मासिक पाळी अनियमित होऊ शकते. मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे बघत असताना पहिली शंका गर्भधारणे विषयी यायला हवी.
काही जण म्हणतील की गर्भधारणा झाल्यावर मासिक पाळी तर चुकत असते. तर हे खरे आहे की गर्भधारणा झाल्यावर मासिक पाळी चुकते. पण मी जसे वर सांगितले की स्त्रियांच्या शरीरातील सर्व प्रक्रिया या हॉर्मोन्स मुळे कंट्रोल होतात. त्यामुळे जर गर्भधारणा झाल्यावर देखील मासिक पाळी आलेली तुम्हाला जाणवू शकते.
या बाबतीत तुम्हाला महिन्यातून दोनदा मासिक पाळी येते असे म्हणतात येणार नाही. पण गर्भधारणा झाल्यावर काही ब्लड स्पॉटिंग होत असते. विशेष करून पहिल्या तिमाहीत ब्लड स्पॉटिंग जास्त होत असते.काही वेळा जास्त व्यायाम किंवा या दरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास सुद्धा ब्लड स्पॉटिंग होऊ शकते. या ब्लड स्पॉटिंग ला काही वेळा महिला मासिक पाळी आली असे समजून कन्फ्युज होऊ शकतात.
त्यामुळे जर तुमची मासिक महिन्यातून दोनदा आली असे तुम्हाला वाटले तर ती गर्भधारणेमुळे ब्लड स्पॉटिंग तर नाही याची खात्री करा. अशा वेळी तुम्ही घरी प्रेगनंसी टेस्ट करू शकता. पण लक्षात असू द्या की काही वेळा प्रेगनंसी टेस्ट रीपोर्ट हे फाल्स निगेटीव असू शकतो. त्यामुळे अशा वेळी दुसऱ्यांदा प्रेगनंसी टेस्ट करावी.
संबंधित वाचा – मासिक पाळी नियमित न आल्यास काय करावे ?
३. तारुण्यावस्था (puberty)
तुम्हाला जर नुकतीच मासिक पाळी येण्याचे चालू झाले असेल तर तुम्हाला महिन्यातून दोनदा मासिक पाळी येऊ शकते. या वयात मासिक पाळी साठी आवश्यक हॉर्मोन्स सेट्टल होण्यास नुकतीच सुरुवात झालेली असते. किंबहुना हॉर्मोन्स सेट्टल देखील झालेले नसतात. तसेच शरीराला देखील हा होत असलेला अचानक बदल मान्य नसतो.
या वयात तुमची मासिक पाळी हि अनियमित राहणे स्वाभाविक आहे. काही वेळा महिन्यातून दोनदा मासिक येईल तर काही वेळा तुमची मासिक पाळी चे दिवस वाढून मासिक पाळी उशीरा देखील होऊ शकते. ६० ते ८० टक्के महिलांमध्ये त्याच्या तारुण्यावस्थेत ३ वर्षांपर्यंत त्यांची मासिक पाळी नियमित होण्यास अडचण येते.
या मध्ये अनैसर्गिक असे काही नाही. या आर्टिकल नुसार नुकतीच मासिक पाळी चालू झाली असेल तर ती नियमित येण्यास ३ वर्ष लागू शकतात. त्यानंतर हॉर्मोन्स stable होतील त्या नुसार तुमची मासिक पाळी देखील नियमित येण्यास सुरुवात होईल.
यासाठी तुम्ही पीरियड ट्रॅकिंग अॅप वापरू शकता. तुमची मासिक पाळी आणि त्यसंबंधीच्या घटना या अॅप द्वारे तुम्ही ट्रॅक करू शकता.
संबंधित वाचा- मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते ?
३. मेनोपॉज
जर तुमचा रजोनिवृत्ती चा काळ म्हणजेच मेनोपॉज (menopause) जवळ आला असेल तरी देखील महिन्यातून दोनदा मासिक पाळी येण्याच्या घटना घडू शकतात. इथे एक लक्षात घ्या. मी इथे मेनोपॉज जवळ आला असेल तर असे म्हणालो आहे. मेनोपॉज असेल तर असे नाही. म्हणजे जेव्हा तुमचा रजोनिवृत्ती चा काळ जवळ असेल तर त्याआधी काही महीने तुमची मासिक पाळी अनियमित होऊ शकते. या काळाला पेरिमेनोपॉज (perimenopause) असे म्हणतात.
पेरिमेनोपॉज मध्ये तुमचे हॉर्मोन्स बदलायला सुरुवात होत असते. पेरिमेनोपॉज १० वर्षांपर्यंत असू शकतो. या दरम्यान मासिक पाळी उशिरा येणे, लवकर येणे किंवा मासिक पाळी चुकणे या घटना सामान्य आहेत.
त्यानंतर कालांतराने हळू हळू तुम्हाला मासिक पाळी येण्याचे बंद होईल.
माझ्याकडे असे बरेच प्रकरण येतात जिथे स्त्रिया रजोनिवृत्ती च्या जवळ असतात. त्या स्त्रियांना मासिक पाळी नियमित येण्यासाठी चे उपचार हवे असतात. म्हणजे काय तर स्त्रिया या घटनेला आजार समजतात. पण हा काही आजार वगैरे, किंवा कोणतीही आरोग्य समस्या नाही. हा पूर्ण हॉर्मोन्स चा खेळ आहे आणि नैसर्गिक आहे.
त्यामुळे मेनोपॉज च्या आधी काही महीने तुम्हाला मासिक पाळी महिन्यातून दोनदा म्हणजेच मासिक पाळी १५ दिवसाने येऊ शकते.
४. गर्भनिरोधक उपाय बंद करणे
गर्भधारणा टाळण्यासाठी जर तुम्ही गर्भनिरोधक उपायांचा वापर करत असाल आणि मध्येच तो बंद केला असेल तर तुमची मासिक पाळी कमी होऊ शकते. याचा परिणाम असा होतो की तुम्हाला महिन्यातून दोनदा किंवा 15 दिवसांनी मासिक पाळी येऊ शकते.
या मध्ये विशेष करून जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तर असा प्रकार घडू शकतो. कारण गर्भनिरोधक गोळ्या यामध्ये वेगळे काही नसून कृत्रिम हॉर्मोन्स असतात जे तुमची मासिक पाळी नियंत्रित करत असतात. त्यामुळे अचानक बंद किंवा गोळ्यांचा डोस घ्यायचा विसरला असाल तर तुम्हाला महिन्यातून दोनदा मासिक पाळी येण्याची शक्यता अधिक असते.
अचानक या गोळ्या किंवा उपायांमध्ये खंड पडल्यास तुमचे हॉर्मोन्स खूप जास्त प्रमाणात डिस्टर्ब होतात. याचाच परिणाम तुमच्या मासिक पाळीवर होऊन महिन्यातून दोनदा मासिक पाळी येऊ शकते.
याचबरोबर ज्यांनी गर्भनिरोधक उपाय वापरायचे सुरू केले आहे त्यांना देखील सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मासिक पाळी मध्ये अनियमितता बघायला मिळू शकते.
वरील जे ४ कारणे मी सांगितलेली आहेत ते खूप सहाजिक आहेत. म्हणजे ६० ते ८० टक्के मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याच्या प्रकरणांमध्ये वरील ४ कारणे मुख्यता आढळतात. त्यामुळे मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे जाणून घेत असताना पहिल्यांदा या कारणांचा विचार करावा असे अपेक्षित आहे.
यानंतर आपण जी कारणे बघणार आहोत ती कारणे वेगळी आहेत. या यामध्ये तुमच्या आरोग्य विषयक समस्या, काही आजार आणि जीवनशैलीबाबत इतर काही घटक जे तुमच्या मासिक पाळीच्या नियमीततेवर प्रभाव टाकू शकतात ही कारणे येतात.
संबंधित वाचा – मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय
मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याचे कारणे: (सतर्क)
१. एंडोमेट्रिओसिस (endometriosis)
एंडोमेट्रिओसिस हा गर्भाशयाचा आजार आहे. यामध्ये गर्भाशयाचा काही भाग इतर ठिकाणी वाढतो. म्हणजे गर्भाशयाचा जो एंडोमेट्रियल टिशू असतो तो फॅलोपियन ट्यूब, अंडाशय, किंवा इतर भागात वाढू शकतो. या आजारात पोटात त्रास, तीव्र क्रॅम्प होणे अशी लक्षणे आढळतात.
याचसोबत एंडोमेट्रिओसिस मध्ये अतिरिक्त स्पॉटिंग आणि ब्लीडिंग (heavy bleeding) होऊ शकते. खूप जास्त प्रमाणात ब्लीडिंग होत असल्यामुळे महिलांना मासिक पाळी असल्याचा संशय येतो. पण ही मासिक पाळी नसून एंडोमेट्रिओसिस मुळे होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव असतो.
याचे कारण हे गर्भाशयाची इतर ठिकाणी अतिरिक्त झालेली ही वाढ असते. मासिक पाळी मध्ये गर्भाशयाचा काही भाग वितळून (uterine shedding) दर महिन्याला तो रक्ताच्या माध्यमातून बाहेर पडत असतो. पण एंडोमेट्रिओसिस सारख्या स्थितिमध्ये गर्भाशयाची अतिरिक्त वाढ असल्यामुळे तो भाग सहजतेने वितळत नाही. त्यामुळे तो भाग बाहेर पडण्यासाठी वारंवार स्त्राव होत असतो ज्यामुळे तुम्हाला माहिन्यातून दोनदा मासिक पाळी आल्याचे जाणवते.
२. थायरॉईड चे आजार
थायरॉईड ग्रंथी शरीरातील महत्वाची ग्रंथी आहे. ही छोटीशी ग्रंथी आपल्या घश्याच्या समोरच्या बाजूला असते. ही ग्रंथी अनेक महत्वाचे हॉर्मोन्स तयार करते. पुढे हे हॉर्मोन्स मासिक पाळी नियंत्रित करत असतात. तुम्हाला जर या थायरॉईड चा कोणताही आजार असेल तर तुमच्या मासिक पाळी च्या नियमीततेवर त्याचे परिणाम होऊ शकतात.
थायरॉईड संबंधी दोन आजार होऊ शकतात.
- हायपरथायरॉईडीझम (hyperthyroidism)
- हायपोथायरॉईडीझम (hypothyroidism)
हे दोन्ही थायरॉईड चे आजार तुमच्या मासिक पाळी साठी आवश्यक हॉर्मोनल बॅलेन्स बिघडवू शकतात. परिणामी महिन्यातून दोनदा मासिक पाळी येणे किंवा मासिक पाळी चुकने असे प्रकार घडू शकतात.
जसे की हायपरथायरॉईडीझम मध्ये तुमची मासिक पाळी चा स्त्राव जास्त दिवस राहू शकतो किंवा वारंवार मासिक पाळी येऊ शकते जसे की दर १५ दिवसाला मासिक पाळी येणे.
हायपोथायरॉईडीझम मध्ये मासिक पाळी कमी दिवसांसाठी राहू शकते तसेच एखाद्या वेळेला मासिक पाळी उशिरा येणे किंवा मासिक पाळी चुकणे या समस्या होऊ शकतात.
३. गर्भशयाच्या गाठी
गर्भाशय आणि गर्भाशय ग्रीवा या दोन जागा गाठी तयार होण्यासाठी खूप अनुकूल आहेत. त्यामुळे बहुतेक महिलांमध्ये या ठिकाणी गाठी तयार होत असतात. या गाठी सहसा कॅन्सर किंवा ट्यूमर चे स्वरूप नसतात. पण यामुळे तुम्हाला अनेक लक्षणे जाणवू शकतात. यापैकी एक म्हणजे मासिक पाळीच्या मध्ये रक्तस्त्राव होणे ज्यामुळे तुम्हाला मासिक पाळी आल्याचे जाणवते. इतर लक्षणे जसे पोट दुखणे, वारंवार लगवी ला जाणे हे सुद्धा जाणवू शकतात.
काही वेळा या गाठी निरुपद्रवी (harmless) असतात. पण पुढे त्याची वाढ आणि रूपांतर ट्यूमर मध्ये होऊ नये आणि त्रास अधिक तीव्र जाणवू यासाठी योग्य निदान आणि उपचार घेणे आवश्यक आहे.
या गाठी दोन प्रकारच्या असतात.
- फायब्रॉइड (fibroid)
- पॉलीप (polyp)
फायब्रॉइड
फायब्रॉइड ची गाठ ही गर्भाशय च्या टिशू पासूनच तयार होत असते. या गाठीला यूटेराईन फिब्रॉईड (uterine fibroid) किंवा एंडोमटेरियल फिब्रॉईड (endometrial fibroid) देखील म्हणतात. या गाठी सर्वसामान्य कोणत्याही वयात येऊ शकतात. सामान्यपणे या गाठी मुळे हेवि ब्लीडिंग आणि वेदना युक्त मासिक पाळी येऊ शकते.
पॉलीप
पॉलीप गाठी गर्भाशय किंवा गर्भाशय मुखाच्या ठिकाणी येत असतात. सामान्यपणे तरुण वयातील मुलींमध्ये या गाठी होण्याचे प्रमाण अधिक असते. या गाठी चा आकार एखाद्या धान्याच्या दाणे एवढा ते टेनिस बॉल च्या आकार एवढा असू शकतो.
साधारणपणे या दोन्ही प्रकारच्या गाठी तुमचे हॉरमोन बिघडवू शकतात. पण बहुतेक वेळा या दोन्ही प्रकारच्या गाठी मुळे तुम्हाला अचानक आणि अवेळी ब्लीडिंग किंवा स्पॉटिंग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्हाला महिन्यातून दोनदा मासिक पाळी आल्यासारखे वाटू शकते.
४. गर्भपात (miscarriage)
तुमची मासिक पाळी नुकतीच होऊन गेली असेल पण काही दिवसांनी लगेच पुन्हा अचानक ब्लीडिंग होत असेल तर तो गर्भपात चा धोका असू शकतो. काही वेळा गर्भधारणा झाल्याचे बरेच दिवस निष्पन्न होत नाही. त्यामुळे काहीही खबरदारी न घेता नको त्या गोष्टी महिलांकडून होतात. त्यामुळे त्या गर्भाला धोका पोचतो आणि गर्भपात होतो.
अशा वेळी हेवि ब्लीडिंग होऊ शकते ज्याला तुम्ही मासिक पाळी शी कन्फ्युज करू शकता.
मासिक पाळी हा नक्कीच महत्वाचा विषय आहे. पण या बाबतीत हे ही जाणून घेणे महत्वाचे आहे की मासिक पाळी बाबत बऱ्याच गोष्टी या अनिश्चित असतात. जसे की तुमची मासिक पाळी वेळेवर येईल की नाही, मासिक पाळी मध्ये किती स्त्राव होईल वगैरे. एक घटक जो मासिक पाळी ला नियंत्रित करतो तो म्हणजे हॉर्मोन्स. हे हॉर्मोन्स मासिक पाळी च्या प्रत्येक घटकांवर परिणाम करत असतात.
पण अडचण इथे येते की हे हॉर्मोन्स अनेक गोष्टींमुळे विचलित किंवा कमी जास्त होत राहतात. ज्यामध्ये घाबरण्याचा काही विषय नसतो. बहुतेक वेळा या सर्व गोष्टी नॉर्मल असतात.
आज आपण मासिक पाळी 15 दिवसांनी येण्याची कारणे बघितले. या कारणांमध्ये काही सामान्य कारणे आहेत ज्यामध्ये तुम्हाला विशेष उपचार किंवा सल्ला घेण्याची फारशी आवश्यकता पडत नाही. जसे की गर्भधारणा, राजोनिवृत्ती, तरुण्यावस्था आणि गर्भयनिरोधक उपाय चुकवणे.
इतर गंभीर कारणे आहेत ज्यामध्ये तुम्हाला अधिक लक्ष देण्याची आणि त्या अनुषंगाने डॉक्टरांकडे त्या विषयी सल्ला घेण्याची गरज आहे. या यामध्ये गर्भाशयाच्या गाठी, thyroid चे आजार, एंडोमेट्रिओसिस आणि गर्भपात सारखी कारणे बघितली. या कारणांच्या बाबतीत तुम्हाला होत असलेली ब्लीडिंग मासिक पाळी मुळे आहे की इतर काही कारणांमुळे आहे हे जास्त लक्षात घेण्याची गरज असते.
जर तुम्हाला मी दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर कमेन्ट वरुण कळवू शकता. धन्यवाद.
FAQ’s
अनियमित मासिक पाळी कशामुळे येते?
अनियमित मासिक पाळी अनेक कारणांमुळे येऊ शकते. या सर्व करणांना एक घटक जबाबदार असतो तो म्हणजे होरमोनल इमबॅलेंस. म्हणजे मासिक पाळी नियमीततेसाठी आवश्यक होरमोन चे असंतुलन होते.
मासिक पाळी जास्त दिवस राहते, काय करावे ?
मासिक पाळी जास्त दिवस राहते म्हणजे तुम्हाला जास्त ब्लीडिंग होत आहे असे म्हणत येईल. निर्मल पेक्षा जास्त ब्लीडिंग होण्यासाठी काही कारणे असतात. ती कारणे शोधून तुम्हाला त्यावर उपचार करावा लागणार आहे.
मासिक पाळी उशिरा का येते ?
मासिक पाळी उशिरा येण्यासाठी अनेक कारणे असू शकतात. यासाठी गर्भधारणा, गर्भशयाच्या गाठी, होरमोनल इमबॅलेंस.
मासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय
मासिक पाळी लवकर येण्यासाठी ओवा घेऊन सकाळ आणि रात्री अशा दोन वेळी बारीक चावून खा.
मासिक पाळी येण्याची लक्षणे काय आहेत ?
मासिक पाळी येण्याची लक्षणे व्यक्ति नुसार वेगवेगळी असतात. पोटात दुखणे, डोके दुखणे, थकवा, कंबरदुखी, भूक कमी होणे, काही वेळा बद्धकोष्टता सारखी लक्षणे जाणवतात.
Article reviewed by- Dr. Sachin Ghogare
Owner of healthbuss.
Health expert, professional, consultant and medical practitioner.
Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS).
Working as Community Health Officer.
Maharashtra Council of Indian Medicine Registration number I-92368-A.
Central healthcare professional registry ID 83-2348-4448-2747